राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे 

ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे
 निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच निवडणूक खर्च करण्याचे आवाहन
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 18  एप्रिल 2024: 

 सर्व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे ( code of conduct)काटेकोर पालन करावे तसेच निवडणूक खर्च निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे (Ashok Shingare) यांनी आज केले. आचारसंहिता लागू झाल्याने काय करावे, काय करु नये, नामनिर्देशनपत्र कसे भरावे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात संपन्न झालेल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी, मुख्य भूमी व भूमापन अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी विजयसिंह देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, तहसिलदार प्रदीप कुडळ, तहसिलदार उज्वला भगत यांच्यासह संबंधित अधिकारी व विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

भारत सरकारच्या पोर्टलवर याबाबत सर्व सविस्तर माहिती आहे. त्याचाही संदर्भ म्हणून वापर करावा. विशेषत: नामनिर्देशनपत्राबाबत आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी. वयस्कर तसेच दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा करण्यावर भर दिला आहे. राजकीय पक्षांनी बुथनिहाय प्रतिनिधी नेमावेत.

तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक 1950

लाच देणे, अवाजवी प्रभाव टाकणे, मतदारांना धाकदपटशा दाखविणे याबाबत काही तक्रारी असतील तर जिल्ह्याच्या तक्रार संनियंत्रण कक्षातील 1950 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. हा कक्ष 24 तास सुरु आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिनगारे यांनी केले.

निवडणूक संबंधीच्या खर्चाबाबत मार्गदर्शन 

उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निवडणूक संबंधीच्या खर्चाबाबत नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी सत्यवान उबाळे ( Satyavan Ubale)आणि ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या बैठकीस ठाणे महानगरपालिकेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी दिलीप सूर्यवंशी, स्थानिक निधी लेखा परिक्षा विभागाचे सहाय्यक संचालक दिपक बोडके, जिल्हा कोषागार अधिकारी सुरेंद्र राऊत यांच्यासह संबंधित अधिकारी व विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

========================================================


========================================================