राज्यातील निवडणुकांचे बिगुल वाजले

पहिल्या टप्यात  16 व 21 फेब्रुवारीला 25 जिल्हा परिषदा व 283 पंचायत समित्यांसाठी मतदान

दुस-या टप्यात 21 फेब्रुवारीला 10 महानगरपालिकांसाठी मतदान

 23 फेब्रुवारीला मतमोजणी

 मुंबई, 11 जानेवारी 17 / AV News bureau:

राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. 25 जिल्हा परिषदा व 283 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन टप्यांत 16 फेब्रुवारी व 21 फेब्रुवारी  रोजी मतदान होणार आहे. पहिल्या टप्यात 15 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 165 पंचायत समित्या आणि दुसऱ्या टप्प्यात 11 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 118 पंचायत समित्यांसाठी निवडणुक होणार आहे. महपालिका,जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची मतमोजणी 23 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. सहारिया यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषदेत दिली.

नागपूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे तिथे निवडणुका होणार नाहीत. तसेच गडचिरोली जिल्ह्याचे दोन टप्यात विभाजन करण्यात आले आहे. आजपासून सर्व जिल्ह्यांत आचारसंहिता लागू झाली आहे.

            महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम

तपशील दिनांक
नामनिर्देशनपत्र सादर करणे 27 जानेवारी  ते 3 फेब्रुवारी 2017
नामनिर्देशनपत्रांची छाननी 4 फेब्रुवारी 2017
उमेदवारी माघारीची मुदत 7 फेब्रुवारी 2017
निवडणूक चिन्ह वाटप 8 फेब्रुवारी 2017
मतदान केंद्रनिहाय मतदार यादीची प्रसिद्धी 8 फेब्रुवारी 2017
मतदानाचा दिनांक 21 फेब्रुवारी 2017
मतमोजणीचा दिनांक 23 फेब्रुवारी 2017

 

निवडणूकीचा पहिला टप्पा

  • 15 जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणा-या 165 पंचायत समित्या
  • 16 फेब्रुवारीला निवडणूक
  • जिल्हा परिषदा: जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील 8 पंचायत समित्या. या जिल्हा परिषदांतर्गतच्या एकूण 165 पंचायत समित्या

निवडणूकीचा दुसरा टप्पा

  • 21 फेब्रुवारीला निवडणूक
  • जिल्हा परिषदा: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, नाशिक, अमरावती व गडचिरोली जिल्ह्यातील 4 पंचायत समित्या . या जिल्हा परिषदांतर्गतच्या एकूण 118 पंचायत समित्या

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम

निवडणूक कार्यक्रम तपशील पहिला टप्पा

(15 जि. प. व 165 पं.स.)

दुसरा टप्पा

(11 जि. प. व 118 पं.स.)

नामनिर्देशनपत्र सादर करणे 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2017 1 ते 6 फेब्रुवारी 2017
नामनिर्देशनपत्रांची छाननी 2 फेब्रुवारी 2017 7 फेब्रुवारी 2017
जिल्हा न्यायाधीशांकडे अपील 5 फेब्रुवारी 2017 10 फेब्रुवारी 2017
निकालाची संभाव्य अंतिम तारीख 8फेब्रुवारी 2017 13 फेब्रुवारी 2017
अपील नसल्यासउमेदवारीची माघार 7 फेब्रुवारी 2017 13 फेब्रुवारी 2017
अपील असल्यासउमेदवारीची माघार 10फेब्रुवारी 2017 15 फेब्रुवारी 2017
मतदान केंद्रांची यादी प्रसिद्धी करणे 10 फेब्रुवारी 2017 15 फेब्रुवारी 2017
मतदानाचा दिनांक 16 फेब्रुवारी 2017 21 फेब्रुवारी 2017
मतमोजणीचा दिनांक 23 फेब्रुवारी 2017 23 फेब्रुवारी 2017

 

 बहुसदस्यीय पद्धत

बृहन्मुंबई वगळून अन्य सर्व नऊ महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होतील. बहुतांश प्रभाग चार सदस्यांचे आहेत;  परंतु ठाणे, अमरावती व नागपूर महानगरपालिकेतील प्रत्येकी एक प्रभाग तीन सदस्यांचा; तर उल्हासनगर, नाशिक, पुणे व सोलापूर महानगरपालिकेचे प्रत्येकी दोन प्रभाग तीन सदस्यांचे आहेत. त्यामुळे मतदारांना चार किंवा तीन मते द्यावी लागतील. जिल्हा परिषदांच्या निवडणूक विभागातील उमेदवारासाठी व पंचायत समितीच्या निर्वाचक गणातील उमेदवारासाठी प्रत्येकी एक अशी दोन मते ग्रामीण भागातील मतदारांना द्यावी लागतील.

 नामनिर्देशनपत्रांसाठी संगणकीय प्रणाली

या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे दाखल करता येणार आहेत. त्यासाठी संकेतस्थळ विकसित केले आहे. नामनिर्देशनपत्रे सादर करण्यास सुरूवात झाल्यानंतनर संगणकीय प्रणालीद्वारे कुठल्याही वेळेस संगणकावर नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे भरता येतील. त्याची प्रिंट काढून त्यावर सही करून ते विहीत वेळेतच निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे देणे बंधनकारक आहे.

उमेदवारांना शपथपत्रे स्टॅम्प पेपरवर सादर करण्याची आवश्यकता नाही. नामनिर्देशनपत्रे संगणक प्रणालीद्वारे भरण्याची सुविधा उपलब्ध असली तरी उमेदवारी मागे घेण्याचे अर्ज संगणकाद्वारे सादर करण्याची आवश्यकता नाही. उमेदवारांना नामनिर्देशनत्रे व शपथपत्रे भरण्यास अडचण उद्‌भवू नये यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एक किंवा त्यापेक्षा जास्त मदत कक्षाची स्थापना करावी; तसेच सायबर कॅफे व कम्युनिटी फॅसिलिटेशन सेंटरची मदत घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

 जात पडताळणी प्रमाणपत्राचा पुरावा

उमेदवारी अर्जासोबत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे; परंतुजात वैधता प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे अर्ज केल्याची पावती किंवा अन्य पुरावा देण्याची मुभा देण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी निकाल लागल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. अन्यथा त्याची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याची संबंधित अधिनियमात तरतूद आहे.

 ट्रू व्होटर ॲप

सर्वसामान्य नागरिक, मतदार, राजकीय पक्ष, उमेदवार, निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी ट्रू व्होटर ॲप विकसित केले आहे. हे ॲप नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उपयुक्त ठरले आहे. या ॲपमुळे मतदारांना मतदार यादीतील आपले नाव आणि मतदान केंद्र शोधता येणे शक्य होईल. उमेदवारांनी शपथपत्राद्वारे भरलेली माहितीदेखील या ॲपच्या माध्यमातून पाहता येईल. या ॲपच्या माध्यमातून उमेदवारांना आपला दैनंदिन खर्च देखील सादर करणे शक्य होईल. तसेच निवडणुकीचा निकालही मिळू शकेल.

 21 जानेवारीला अंतिम मतदार यादी

या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगातर्फे 5 जानेवारी  रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येईल. ही यादी महानगरपालिकेसाठी प्रभागनिहाय,जिल्हा परिषदेसाठी निवडणूक विभागनिहाय व पंचायत समित्यांसाठी निर्वाचक गणनिहाय विभागण्यात येईल. त्यावर 12 ते 17 जानेवारी 2017 पर्यंत हरकती दाखल करता येतील. त्यानंतर 21 जानेवारी 2017 रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होईल.

 आयोगाकडील नोंदणीकृत पक्ष

  • आतापर्यंत नोंदणी रद्द केलेले पक्ष- 220
  • नोंदणीकृत व मान्यताप्राप्त राजकीय पक्ष- 15
  • नोंदणीकृत राजकीय पक्ष- 190
  • एकूण राजकीय पक्ष- 205

 खर्चाचा तपशील 30 दिवसांत सादर करावा लागणार

उमेदवारांना एकूण खर्चाचा तपशील निकाल लागल्यानंतर 30 दिवसांच्याआत संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करावा लागेल. विहीत पद्धतीने व मुदतीत खर्च सादर न केल्यास संबंधित उमेदवारास अनर्ह केले जाईल.राजकीय पक्षांनी विशिष्ट उमेदवारावर केलेला थेट खर्च आणि उमेदवारांमध्ये विभाजित करता येणारा खर्च 20 दिवसांत सादर करणे आवश्यक आहे. निवडणूक खर्चासाठी स्वीकारलेला निधी व स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय एकूण खर्चाचा तपशीलही पक्षांना निकाल लागल्यानंतर 60 दिवसांच्या आत द्यावा लागेल.

 महानगरपालिका निवडणूक दृष्टिक्षेप

  • महानगरपालिकांची संख्या- 10
  • एकूण लोकसंख्या- 2,57,19,093
  • एकूण प्रभाग- 490
  • एकूण जागा- 1,268
  • महिला- 636
  • अनुसूचित जाती- 171
  • अनुसूचित जमाती- 38
  • नागरिकांचा मागसप्रवर्ग- 343

जिल्हा परिषद निवडणूक दृष्टिक्षेप

  • जिल्हा परिषदांची संख्या- 25
  • एकूण लोकसंख्या- 5,09,37,606
  • एकूण जागा- 1,510
  • महिला- 761
  • अनुसूचित जाती- 189
  • अनुसूचित जमाती- 156
  • नागरिकांचा मागसप्रवर्ग- 408

 पंचायत समिती निवडणूक दृष्टिक्षेप

  • पंचायत समित्याची संख्या- 283
  • एकूण लोकसंख्या- 5,06,56,373
  • एकूण जागा- 3,000
  • महिला- 1,500
  • अनुसूचित जाती- 386
  • अनुसूचित जमाती- 293
  • नागरिकांचा मागसप्रवर्ग- 797