आईचा अधिकार

  • स्वप्ना हरळकर/अविरत वाटचाल
  • नवी मुंबई, 17 मार्च 2024

महाराष्ट्र राज्यात 1 मे पासून सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आईचंही नाव लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांनी आपल्या नावामागे आईचे नाव लावले आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले. काही वर्षांपूर्वी याबाबतचा कायदाही पास करण्यात आला होता. त्यानुसार आपल्या नावामागे आईचे नाव लावणे शक्य होते. मात्र त्याबाबत तेवढ्या प्रमाणात जनजागृती झाली नाही किंवा कदाचित त्याकडे कोणी एवढे गांर्भााने पाहिले नाही. त्यामुळे ही प्रथा मागे पडली.

खरतर एखादे मूल जन्माला घालणे आणि ते वाढवणे हे आई वडील या दोघांचेही कर्तव्य असते. पण जेव्हा मुलाची ओळख चार चौघात पटवून द्यायची वेळ येते तेव्हा तो याचा मुलगी, त्याची मुलगी अशी ओळख सांगितली जाते. पण तिचा मुलगा, तिची मुलगी अशी ओळख खूप कमी वेळा करून दिली जाते. प्रश्न फक्त आईचे नाव लावण्याचा नसून तो तिला मिळालेला सन्मान आहे.

पितृसत्ताक पद्धतीमुळे आई मागे राहिली आणि वडिलांच्या नावाची जोड पुढे आली. आता यामध्ये आईचे कोणते नाव लावण्याचा अधिकार मुलांना मिळाला आहे तर लग्नानंतर आईचे जे नाव बदललेले आहे ते नाव. महिलांना सन्मानाची वागणूक दिली जाते असं कितीही म्हटले तरी लग्नानंतर आजही अनेक मुलींची आधीची ओळख पुसली जाते. लग्नानंतर तिला नवीन नाव दिले जाते ते तिला हवे असते किंवा नाही याबाबत विचारलेही जात नाही. ही प्रथाही बंद व्हायला हवी. वयाच्या तीस वर्षांपूर्वी एक नाव आणि नंतर दुसरे नाव हे स्थित्यंतर केवळ महिलांच्याच बाबतीत होत असते. मग घटस्फोटित महिलांच्या बाबतीत मुलांच्या प्रवेश पत्रावर वडिलांचे नाव काय लिहावे, किंवा लिहू नये याबाबत ती निर्णय घेते. त्यासाठीही लढा तिलाच द्यावा लागतो. अशावेळी सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा होईल.

एखाद्या मुलाच्या आयुष्यात आई वडील दोघेही तितकेच महत्त्वाचे असतात मग नाव केवळ वडिलांचेच का वापरायचे असे प्रश्न आता नक्कीच उपस्थित होणार नाही. मुलीचे लग्न झाल्यानंतरही तिला नव-याच्या नावाआधी आईचे नाव लावण्याचा अधिकार आहे का याबाबतही चर्चा व्हायला हवी. त्याहूनही पुढे जावून मुलींना लग्नानंतर नाव बदलता येणार नाही असाही कायदा व्हावा ही अनेक महिलांची अपेक्षा आहे. अनेक महिला माहेर सासर अशी दोनही आडनावे लावतात पण समोरच्या व्यक्तीकडून ब-याचदा याची टिंगल केली जात असल्याचा अनुभव अनेक महिलांना आहे. त्यामुळे अनेकदा इच्छा असूनही मुली एकच आडनाव वापरतात आणि त्यात आई वडिलांची ओळख कायमची पुसली जाते. या बाजूनेही विचार होणे आता गरजेचे आहे. त्यासाठीही कायदा व्हावा अशी अपेक्षा आहे.

आई चे नाव सरकारी कागदपत्रांमध्ये अनिवार्य केल्यानंतरही आजही अनेक घरांमध्ये आईला मिळणारी वागणूक ही धक्कादायक आहे. तूला कळत नाही आम्ही सांगतो तेच होणार या वाक्याने तर तिच्या दिवसाची सुरुवात होते आणि ती कमावती असो किंवा अशिक्षित अपमानाचा सामना तिलाच करावा लागतो. नाव लावले म्हणजे सन्मान मिळेल याची खात्री नाही देता येणार. जेव्हा जेव्हा महिलांच्या आत्मसन्मानाचा प्रश्न येतो तेव्हा तिलाच त्यासाठी दोषी ठरवले जाते.

शहरात हा बदल खूप सकारात्मक घेतला गेला आहे किंवा जाईलही पण ग्रामीण भागात जेव्हा पुरूषाच्या नावाआधी तिचे नाव लिहायची वेळ येईल तेव्हा तिला दोन शब्द ऐकून घ्यावेच लागणार आहेत. पण आनंद यासाठीच आहे की पुन्हा एकदा मातृसत्ताक पध्दतीकडे आपण वळत आहोत. आईचे नाव प्रत्येकाच्या मनात कायम असते, कदाचित वडिलांच्या आधी तिची जागा असते आता तीच जागा कागदोपत्री लिहायला मिळाली आहे. यामुळे अनेकांकडून भविष्यात केवळ आपले नाव आणि आईचे नाव असेही लिहिले जाईल.

========================================================


========================================================