- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 16 मार्च 2024:
लोकसभा निवडणूकीसाठी निवडणूक कार्यक्रम आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी घोषित केला. देशातल्या लोकसभेच्या 543 जागांच्या निवडणुकीसाठी 7 टप्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 19 एप्रिल, 26 एप्रिल , 7 मे, 13 मे , 20 मे, 25 मे, 1 जून या तारखांना मतदान होणार आहे. यानुसार महाराष्ट्रात ५ व्या टप्प्यात ४८ मतदासंघामध्ये 7, मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. संपूर्ण देशातील सर्व लोकसभा जागांचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे.
राज्यातील निवडणूकीचे टप्पे आणि मतदान
- महाराष्ट्रात पहिल्या टप्पात 19 एप्रिल रोजी रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदारसंघात मतदान होणार आहे.
- दुस-या टप्पात 26 एप्रिल रोजी बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या 8 मतदारसंघात मतदान होणार आहे. 4 एप्रिल पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. तर 8 एप्रिल पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
- तिस-या टप्यात 7 मे रोजी रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघात मतदान होणार आहे.
- चौथ्या टप्पात 13 मे रोजी नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघात मतदान होणार आहे. 25 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे तर 29 एप्रिल रोजी अर्ज मागे घेता येणार आहे.
- पाचवा टप्पा 20 मे रोजी असणार आहे. या 13 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या टप्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान होणार आहे. यासाठी 3 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे तर 6 मे रोजी अर्ज मागे घेता येणार आहे.
- बातमी वाचा
होळीसाठी मध्य रेल्वेच्या कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या
मतदारांची संख्या
देशातल्या 800 जिल्हाधिका-यांशी थेट बोलणे केले असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी दिली, तर मतदारांचीही माहिती त्यांनी दिली त्यामध्ये देशात एकूण 97 कोटी नोंदणीकृत मतदार आहेत. साडे दहा लाखांपेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत तर 55 लाखांपेक्षा जास्त ईव्हीएम मशीन्स आहेत. नवीन मतदारांची संख्या दीड कोटी आहेत. तर देशात 18 ते 21 वयोगटातील नागरिकांची संख्या 21.50 कोटी आहे.
48 हजार तृतीयपंथी नागरिक आहेत. तर 100 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या 2 लाख आहे. 85 पेक्षा जास्त वय असलेले आणि 40 टक्के अपंगत्व असलेल्या नागरिकांची इच्छा असल्यास अशा मतदारांच्या घरी जावून निवडणूक आयोगाचे कर्मचारी त्यांचे मतदान घेणार आहेत.
पर्यावरणाचा विचार
सर्व मतदान केंद्रांवर शून्य कचरा मोहिम राबवली जाणार आहे. त्यासाठी संध्याकाळी 5 नंतर केंद्रावर स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. कागदाचा कमीत कमी वापर करून कार्बन फूटप्रिंटस कमी करावेत यासाठी आदेश देण्यात आले आहेत.
मतदारांना आपला उमेदवार कोण आहे याबाबतची माहिती मिळावी या हेतूने निवडणूक आयोगाने know your candidates (KYC) हे विशेष अप्लिकेशन सुरू केले आहे. या केवायसी अपमध्ये उमेदवारावर दाखल असलेले गुन्हे, त्याची संपत्ती याबाबत माहिती मिळणार आहे. तसेच उमेदवारावर गुन्हे दाखल असल्यास त्याला तीन वेळा वर्तमानपत्रात जाहिरात द्यावी लागणार आहे. टीव्हीवरही माहिती द्यावी लागणार आहे तर राजकीय पक्षाला या संबधित उमेदवाराला उमेदवारी का दिली याबाबत माहिती द्यावी लागणार असल्याचेही निवडणूक आयुक्तांनी यावेळी सांगितले.
——————————————————————————————