कसारा नाका येथे बनावट मद्याचा मोठा साठा जप्त

प्रतिकात्मक छायाचित्र
राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक कोकण विभाग ठाणे यांची धडक कारवाई
रु.1 कोटी, 31 लाख, 45 हजार, 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 14 मार्च 2024

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय ठाणे भरारी पथकाने मिश्रा धाब्याच्या समोर, नाशिक मुंबई रोड, कसारा नाका, कसारा, ता. शहापूर, जि. ठाणे, येथे बेकायदेशीररित्या पंजाब व अरुणाचल प्रदेश या राज्यात निर्मित व विक्रीस परवानगी असलेला व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला बनावट विदेशी मद्याचा साठा एकूण रु.1 कोटी, 31 लाख, 45 हजार, 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
महाराष्ट्र राज्य मुंबई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, सह. आयुक्त (प्रशासन) सुनिल चव्हाण, संचालक (अं. व द.) प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग, ठाणे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे अधीक्षक निलेश सांगडे यांनी दि. १३ मार्च २०२४ रोजी अवैध/नकली/परराज्यातील मद्याविरुध्द कारवाई करण्यासाठी दिलेल्या निर्देशानुसार नाशिक मुंबई रोडवरुन परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार निरीक्षक दिगंवर शेवाळे यांच्या समवेत दुय्यम निरीक्षक व त्यांच्या सहकारी स्टाफने शहापूर तालुक्यातील कसारा नाका नाशिक मुंबई रोडवरील  मिश्रा धाब्याच्या समोर येथे सापळा रचला असता टाटा मोटर्स लि. कंपनीचा एलपीटी ३११८ या मॉडेलच्या ट्रक क्र. युपी- युपी-८३-बीटी- ७२८९ या बाराचाकी ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात पंजाब व अरुणाचल प्रदेश या राज्यात निर्मित व विक्रीस परवानगी असलेला व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले बनावट विदेशी मद्याचे १ हजार ५०२ बॉक्स आढळून आल्याने १) जसपाल तरसेमलाल सिंग, वय ५० वर्षे, (वाहनचालक) २) गुरदयाल गुरदासराम सिंग, वय ४४ वर्षे,  यांना अटक करण्यात आली.

परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीसाठी वापरलेला टाटा मोटर्स लि. कंपनीचा एलपीटी ३११८ या मॉडेलचा बाराचाकी ट्रक क्र. युपी-८३-बीटी-७२८९. या वाहनासह पंजाब व अरुणाचल प्रदेश राज्यात निर्मित व विक्रीस परवानगी असलेला व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले बनावट विदेशी मद्याचे एकूण १ हजार ५०२ बॉक्स, दोन मोबाईल व एका वाहनासह अंदाजे किंमत रु. १ कोटी ३१ लाख ४५ हजार ८० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक संदीप जरांडे व रिंकेश दांगट, तसेच जवान सर्वश्री, केतन वझे, नारायण जानकर, हनुमंत गाढवे, संपत वनवे, नानासाहेब शिरसाठ, भाऊसाहेब कराड, विजय पाटील, सागर चौधरी यांनी पार पाडली. दुय्यम निरीक्षक संदीप जरांडे हे पुढील तपास करीत आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक कोकण विभाग ठाण्याचे निरीक्षक डी. टी. शेवाळे यांनी दिली आहे.

========================================================


========================================================