मतदारच महापालिकेची निवडणूक लढवणार
ठाणे, 11 जानेवारी 2017/AV News Bureau :
ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार, नियोजन शून्य विकास योजना, प्रशासनाची दादागिरी, नगरसेवकांची अकार्यक्षम मक्तेदारी, काळ्या पैशाच्या आणि दादागिरीच्या जोरावर सुरू असलेले राजकारण यामुळे शहराच्या विकास खुंटला आहे. ठाणेकरांना हवा असलेला विकास त्यांनी स्वतःच करावा, यासाठी येत्या महापालिका निवडणूकीत सुजाण मतदारांमधूनच उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ठाणे मतदार जागरण अभियानाचे समन्वयक उन्मेष बागवे यांनी दिली.
ठाणे मतदार जागरण अभियानाची माहिती देण्यासाठी ठाण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला अनिल शाळीग्राम, सुनिल कर्णिक, संजीव साने, वंदना शिंदे, राजय गायकवाड, उन्मेष बागवे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
गेल्या 15-20 वर्षांत ठाणे शहराचा म्हणावा तसाच विकास झालेला नाही. अनधिकृत बांधकामे, बुजवलेले तलाव, खारफुटीची तोड, अनियंत्रित वाळू उपसा, शहर विकास आराखड्याची लावलेली वाट, सार्वजनिक वाहतूक, आरोग्य व्यवस्थेची उलाडेली दैना यामुळे ठाणेकर त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे आता शहराच्या विकासासाठी चांगल्या विरोधी पक्षाची म्हणजेच प्रामाणिक, अभ्यासू नगरसेवकांची गरज आहे. जो नागरिकांच्या हितासाठी चुकीच्या गोष्टींना विरोध करील. तसेच स्थानिक प्रशासनावर, निवडून आलेल्या नगरसेवकांच्या कारभारावर पुढील पाच वर्षे लक्ष ठेवील असा पर्याय उभा करण्याची ही मोहीम असल्याची माहिती बागवे यांनी दिली.