ठाणे जिल्हास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे नियोजन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 29 फेब्रुवारी  2024 

ठाणे जिल्ह्यातील योजनेच्या लाभार्थ्यांकरिता ‘शासन आपल्या दारी’ हा विशेष कार्यक्रम  3 मार्च रोजी, कल्याण येथे प्रीमियर मैदान, कल्याण-शिळफाटा मार्ग, कोळे याठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.याविषयी ठाणे जिल्हाधिकारी स्तरावर झालेल्या आढावा बैठकीनंतर नमुंमपा आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी या अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करावयाच्या कामांविषयी नियोजनाच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी-कर्मचारी यांस निर्देश दिले आहेत.

नागरिक योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात जाणे सहसा टाळतात असे चित्र दिसून येते. त्यामुळे ते पात्र असूनही त्यापासून वंचित राहतात. या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून शासनाच्या योजनाच लाभार्थ्यांपर्यंत घेऊन जाण्याचा उपक्रम करण्याचे ठरले आणि शासन आपल्या दारी हा अभिनव कार्यक्रम पुढे आला.   याव्दारे शासकीय योजनांसाठी पात्र असलेले लाभधारक व शासन यांच्यामध्ये अधिक समन्वय होऊन नागरिकांच्या प्रती आपुलकी आणि बांधिलकी जपण्याची शासनाची भूमिका नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहचावी यादृष्टीने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम नागरिकांसाठी योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी अत्यंत लाभदायी आहे.

या उपक्रमामध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा तसेच नवी मुंबई महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था यांचा सक्रिय सहभाग महत्वाचा असून विविध शासकीय विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचे लाभ एकाच दिवशी विक्रमी संख्येने लाभार्थ्यांपर्यंत मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहचविले जाणार आहेत.

 या उपक्रमाच्या नियोजनाकरिता श्रीकांत शिंदे यांनी विविध विभागांचा आढावा दूरदृष्यप्रणालीव्दारे घेतला असून यामध्ये जिल्हाधिकारी  अशोक शिनगारे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये नमुंमपा अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले यांनीही सहभागी होत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त  नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी करण्यात आलेल्या नियोजनाविषयी सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमाप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय योजनांचे लाभार्थीही उपस्थित राहणार असून याबाबतची सर्व व्यवस्था तसेच कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आवश्यक असणा-या बाबींची उपलब्धताही नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करून देण्यात येत आहे.तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी 3 मार्च रोजीच्या कोळे, कल्याण येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे. 

========================================================

========================================================

========================================================