नमो महारोजगार मेळावा यशस्वी होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे      -जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

युवक/युवतींसाठी कोकण विभागस्तरीय “नमो महारोजगार” मेळावा 29 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे 22  फेब्रुवारी 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ठाणे जिल्ह्यामध्ये कोकण विभागस्तरीय “नमो महारोजगार” मेळाव्याचे आयोजन 29 फेब्रुवारी व 1 मार्च 2024 रोजी हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजिवडा, ठाणे (पश्चिम) येथे करण्यात येणार आहे. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे केले.


ठाणे जिल्ह्यामध्ये कोकण विभागस्तरीय “नमो महारोजगार” मेळाव्याचे आयोजन 29 फेब्रुवारी व 1 मार्च 2024 रोजी हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजिवडा, ठाणे (पश्चिम) येथे करण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या तयारीविषयी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये- धुळे, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, भिवंडी महानगरपालिका आयुक्त अजय वैद्य, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) गोपीनाथ ठोंबरे, ठाणे उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील, कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त डी.डी.पवार, सा.बां. विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पुजारी, सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल पाटील, सहायक आयुक्त संध्या साळुंखे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे विभाग/कार्यालयप्रमुख तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे कौशल्य विकास आयुक्त  निधी चौधरी आणि जिल्ह्याबाहेरील इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी  शिनगारे  पुढे म्हणाले, जवळपास एक लाख पन्नास हजार रोजगार देण्याच्या माध्यमातून सर्वांना एक चांगले काम करण्याची संधी मिळाली आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी मिळून जास्तीत जास्त कंपन्यांकडून त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. त्याची नोंदणी करावी तसेच जास्तीत जास्त शहरी व ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण-तरुणींपर्यंत या “नमो महारोजगार” मेळाव्याची माहिती पोहोचवावी. त्यांची पोर्टलला नोंदणी करून घ्यावी. हा रोजगार मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधितांनी झोकून देऊन प्रयत्न करावा.

हा रोजगार मेळावा महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला आहे. या माध्यमातून 1 लाख 50 हजार युवक/युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यासह कोकण विभागातील अन्य जिल्ह्यातील कंपन्यांनी त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती प्रशासनास द्यावी तर नोकरी/रोजगार इच्छुक बेरोजगार युवक-युवतींनी आपली नोंदणी https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

“नमो महारोजगार” मेळाव्याकरिता आजपर्यंत 750 कंपन्या/आस्थापनांकडून 67 हजार 991 रिक्त पदांची पोर्टलद्वारे नोंदणी करण्यात आली असून रोजगार मेळाव्याच्या आयोजनाच्या दृष्टीकोनातून कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी/महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी/व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय तसेच उद्योग व कामगार विभाग यांना त्यांनी विविध कंपन्यांशी संपर्क साधून रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

बातमी वाचा : जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची संवेदनशीलता अन् छत्तीसगडच्या चार वेठबिगार व्यक्तींची झाली सुटका

जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी व रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करणे तसेच उमेदवार नोंदणी व रिक्त पदांसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. खाजगी आस्थापनांनी त्यांच्याकडील रिक्त पदांची नोंदणी वेब पोर्टलवर करण्यासाठी अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत असून याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी 1800 120 8040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या साळुंखे यांनी केले  आहे.

========================================================


========================================================

========================================================