- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- सांगली, 20 फेब्रुवारी 2024
सांगली – मिरज महापालिकेचे माजी नगरसेवक साजिद अली पठाण, फारूक जमादार यांच्या नेतृत्वाखाली मिरजमधील मुस्लिम समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, आ.गोपीचंद पडळकर आदी यावेळी उपस्थित होते.
माजी नगरसेवक राजू गोपाल आचारी, सामाजिक कार्यकर्ते नितेश कांबळे, बजरंग दल मिरज शहर प्रमुख विनायक ठोंबरे यांनीही यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. श्री.फारूक जमादार यांची भाजपा प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी यावेळी घोषित केले
बावनकुळे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला विकसित, आत्मनिर्भर देश बनविण्याचा संकल्प केला आहे. सर्व जाती धर्मियांच्या नागरिकांना साथीला घेत ‘ सब का साथ, सब का विकास सब का विश्वास’ हा मंत्र प्रत्यक्षात आणला आहे. काँग्रेसने सत्तेत असताना मुस्लीम समाजाचा वापर मतपेढी म्हणून केला. काँग्रेस ने आजवर भाजपा विरोधात मुस्लीम समाजात गैरसमज पसरविण्याचे काम केले. मोदी सरकारने सर्व धर्मियांतील गरीबांच्या कल्याणाच्या योजना आखल्या आहेत. या गरीब कल्याणाच्या योजना मुस्लीम समाजातील गरजूंपर्यंत नेण्याचे काम फारूक जमादार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करावे, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.
सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले की, मिरजचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपण सर्व धर्मियांना न्याय दिला आहे. विकास कामे करताना कोण कुठल्या धर्माचा आहे याचा विचार आपण कधीच केला नाही.
भाजपामध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा पक्ष पातळीवर योग्य सन्मान राखला जाईल. या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही, असेही खाडे यांनी सांगितले .
========================================================
========================================================
========================================================