राजपत्रित अधिकारी महासंघाचा 38 वा वर्धापन दिन
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 8 फेब्रुवारी 2024
शासन आणि प्रशासन ही लोकशाही रथाची दोन चाके आहेत. ही दोन्ही चाके समान वेगाने धावलीत की विकास वेगाने होतो. याचे उदाहरण राज्यात पहायला मिळत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 38 व्या वर्धापन दिनानिमित्त वांद्रे येथे नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कोकण विभागाचे आयुक्त महेंद्र कल्याणकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, राजेंद्र भोसले, महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, कोषाध्यक्ष नितीन काळे, कल्याण केंद्र समन्वयक टाव्हरे, सरचिटणीस समीर भाटकर आदी उपस्थित होते.
राज्याच्या कारभारात अधिकाऱ्यांचे मोठे योगदान असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्याच्या कारभारात तुमचे काम महत्वाचे आहे. नियमांचे पालन करून अधिकारी काम करत असतात. काम नियमांमध्ये कसे करावे याचे चांगले ज्ञान अधिकारी वर्गाकडे आहे. अधिकारी हे शासनाचे अविभाज्य अंग आहे. राज्याचा गाडा हाकताना रथाची चाके आपण आहोतच. पण त्याचबरोबर या चाकांमध्ये वंगण घालण्याचे काम ही अधिकारी वर्ग करत असतो. शासन आणि प्रशासन यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे राज्यात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शासन राज्यातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी अनेक योजना राबवत आहे. अनेक लोककल्याणकारी निर्णय घेत आहे. या योजना आणि निर्णय लोकांपर्यंत पोहचवण्याचे आणि त्याचा लाभ लोकांना देण्याचे काम प्रशासन करत आहे. सरकारची प्रतिमा निर्माण करण्याचे काम अधिकारी करत आहेत. लोकांच्या जीवनात चांगले दिवस येतील ही शासनाची भूमिका आहे. त्यासाठी योजनांची अंमलबजावणी अधिकारी करत असतात.
अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख काम करावे असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त लोकांना भेटावे. जितके जास्त अधिकारी जनतेला भेटतील तितके चांगले काम होईल आणि माझ्याकडे येणाऱ्या लोकांचे प्रमाण कमी होईल.
- महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी भरीव निधी देणार
राजपत्रित अधिकारी महासंघाच्या अनेक मागण्या आहेत. या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्या पूर्ण होतील. महासंघ कल्याण केंद्रासाठी निधी दिला जाईल. जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत येत्या अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
प्रास्ताविकात महासंघाचे अध्यक्ष देसाई यांनी महासंघाच्या कामाचा आढावा घेतला. तसेच आतापर्यंत केलेल्या मागण्या मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार व्यक्त केले. आभार काळे यांनी व्यक्त केले तर सूत्र संचालन मीनल जोगळेकर यांनी केले.
========================================================
========================================================
========================================================