- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 7 जानेवारी 2024
भारताची पहिली सौर वेधशाळा असलेले आदित्य एल-1 हे अंतराळयान पृथ्वीपासून 125 दिवसांचा प्रवास करून आपल्या निश्चित स्थळी पोहोचले आहे. 6 जानेवारी रोजी संध्याकाळी चार वाजता लॅंग्रेज पॉईंटजवळच्या (एल-1) होलो कक्षेमध्ये (प्रभामंडळ) पोहोचले आहे. या एल-1 कक्षेचे पृथ्वीपासूनचे अंतर 1.5 दशलक्ष किमी म्हणजे 15 लाख किलोमीटर आहे. ही त्रिमीतीय कक्षा आहे ज्यामध्ये सूर्य, पृथ्वी आणि अंतराळयान यांचा समावेश होतो. या बिंदूवर पृथ्वी आणि सूर्य यांचे गुरूत्वाकर्षण समान असते. या कक्षेमध्ये आदित्य एल-1 पुढिल पाच वर्षे काम करणार आहे. सूर्यातील क्रोमोस्फेरिक आणि कॉरोनल डायनॅमिक्सचे सतत निरीक्षण करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी ही वेधशाळा उपयोगी पडणार आहे.
आदित्य एल-1 ला आपल्या नियोजित कक्षेत स्थिर करणे हा या मोहिमेतील अत्यंत क्लिष्ट आणि महत्वाचा टप्पा होता. त्यासाठी अचूक आणि सूक्ष्म दिशादर्शक आणि नियंत्रणाची गरज होती. कक्षेत स्थिरावल्यानंतर आता त्यावर असलेल्या विविध उपकरणांवर सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे. आदित्य एल-1 ला आपल्या नियोजित कक्षेत स्थिर करणे हा इस्रोसाठी अभिमानाचा क्षण तर आहेच तसेच आगामी कठिण अंतराळ मोहिमांसाठी आत्मविश्वास देणारा क्षण असल्याचे इस्रोने आपल्या संकेतस्थळावर म्हटले आहे.
आदित्य-L1 ची रचना यूआर राव सॅटेलाइट सेंटर येथे विविध इस्रो केंद्रांच्या सहभागाने करण्यात आली. आदित्य-L1 वरील सात पेलोड हे भारतीय वैज्ञानिक प्रयोगशाळा, आयआयए, आययूसीए, इस्रो यांनी विकसित केले आहेत. आदित्य-L1 अंतराळयान 2 सप्टेंबर 2023 रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. येथून, आदित्य-L1 ने सूर्य-पृथ्वी-L1 लॅग्रेंज पॉइंटच्या दिशेने एक प्रवास सुरू केला, ऑनबोर्ड प्रोपल्शन सिस्टीमच्या सहाय्याने, त्याच्या कक्षेचा आकार अंडाकार कक्षेत भ्रमंती करत वाढवला आणि त्याचा प्रवास L1 बिंदूच्या दिशेने सुरू झाला.
- लँग्रेज पॉइंट
या बिंदूवरून सूर्य कोणत्याही अडथळ्याविना सलग दृष्टीस पडतो. त्याला लँग्रेज पॉइंट म्हटले जाते. लँग्रेज या शब्दाचा अर्थ इटालियन फ्रेंच गणितज्ञ जोसेफ लोईक लॅंग्रेज यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. त्यांनी 1972 साली आपल्या तंत्रज्ञानाच्या आधारे हा बिंदू आपल्या जर्नल थ्री बॉडी पॉब्लेममध्ये वर्णन केले आहे. मात्र त्याआधीसुध्दा एल- 1, एल- 2, एल-3 हे तीन बिंदू शोधण्याचे श्रेय स्वीस गणितज्ञ लेनॉर्ड आयलॉर्ड यांना दिले जाते. एल-1 या बिंदूवर नासाने याआधीही सौर वेधशाळा सोहो पाठवली आहे. तसेच जगप्रसिध्द जेम्स वेब खगोलिय दुर्बिण एल-2 या बिंदूवर स्थापित केली आहे. एल- 1 या बिंदूची पृथ्वीपासूनचे अंतर 15 लाख किलोमीटर आहे. पृथ्वीपासून सूर्यापर्यंतचे हे अंतर केवळ एक टक्के आहे. असे पाच लॅंग्रेज पॉईंट शोधण्यात आले आहेत. या सर्व बिंदूवर उपग्रह आपले संशोधनाचे काम पूर्ण करू शकते. या बिंदूवर सूर्य कोणत्याही ग्रहणाच्या अडथळ्याशिवाय कायमच दिसत राहणार आहे. तसेच कोणत्याही निरिक्षण, मापके आणि विश्लेषण यांसाठी इथे कोणताही अडथळा येणार नाही. याच बिंदूवर उपग्रह स्थिर करण्याचे महत्वाचे कारण हेच आहे की या बिंदूवर कोणताही वायू नाही इथे कमीत कमी इंधन वापरून उपग्रह वेधशाळा आपले काम करू शकते.
या बिंदूवर सूर्य किंवा पृथ्वीची गुरुत्वाकर्षणशक्ती काम करत नाही. या बिंदूच्या चारही बाजूंनी होलो ऑर्बिट (प्रभामंडळ कक्षा) असून इथे कोणताही ग्रह स्थिर राहू शकतो.
आदित्य-L1 मोहिमेमध्ये सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सात वैज्ञानिक पेलोड्स आहेत जे सूर्याच्या बाहेरील आवरणाचा अभ्यास करतील. आदित्य एल-1 मोहिमेचे कार्य सौर क्रियाकलाप आणि अवकाशातील हवामान शोधणे हे असेल. हा डेटा इस्रोकडे पाठवला जाईल, ज्यामुळे सूर्यामुळे पृथ्वी संकटात आहे की नाही, याचे आकलन करणे सोपे होईल. आदित्य एल- 1 मोहीम सूर्याचा अभ्यास करून तिथे होणाऱ्या घडामोडींचा अभ्यास करेल. सूर्यावरील घडामोडींचा पृथ्वी आणि इतर ग्रहांवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला जाणार आहे. आदित्य एल-1 सूर्याच्या फोटोस्फीयर, क्रोमोस्फीयर, सूर्याभोवतीच्या कोरोनावर नजर ठेवेल. तसेच आजूबाजूच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक कणांचा आणि चुंबकीय क्षेत्र अभ्यास करणार आहे.
========================================================
========================================================