शिवडी न्हावाशेवा (अटल सेतू) ट्रान्सहार्बर सी लिंक वर कारसाठी 250 रुपये टोल

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 4 जानेवारी 2024

नवी मुंबई- मुंबईला जोडणाऱ्या शिवडी न्हावा शेवा ट्रान्सहार्बर अर्थात अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित करण्यात आला आहे. एका कारसाठी या मार्गावर एकेरी प्रवासासाठी 250 रुपये टोल आकारण्यात येणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  अटल सेतूसाठी आकारण्यात येणाऱ्या पथकर दराचा एक वर्षानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.  

आज झालेल्या निर्णयानुसार  कारसाठी 500 ऐवजी 250 रुपये आकारण्यात येतील. वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकरिता परतीचा पास एकेरी पथकराच्या दीडपटदैनिक पास एकेरी पथकराच्या अडीचपट आणि मासिक पास एकेरी पथकराच्या पन्नास पट अशी सवलत देण्यात आलेली आहे.

अटल सेतू उभारणीकरिता एकूण रु.21,200 कोटी इतका खर्च आला असून त्या पैकी रु.15,100 कोटी इतके कर्ज घेण्यात आलेले आहे. या प्रकल्पामुळे पनवेलपासून दक्षिण मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांचे सुमारे 15 कि.मी. इतके अंतर कमी होईल. त्याचबरोबर गर्दीच्या वेळी सुमारे दीड ते दोन तासांच्या वेळेची बचत होईल. परिणामी इंधनावरील खर्चात वाहनाकरिता किमान रु. 500 इतकी बचत होईल.

अटल सेतू या सागरी मार्गाच्या दोन्ही बाजूने शिवडी येथील फ्लेमिंगो पक्ष्यांच्या संरक्षणाकरिता पहिल्या 0 ते 4 किलोमीटर दरम्यान दोन्ही बाजूने ध्वनी संरक्षक (Noise Barrier) व अतिसंवेदनशील अशा भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) व माहूल येथील तेल शुद्धीकरण केंद्र ( Oil Refinery ) या 4 ते 10 किलोमीटर अंतरामध्ये दृश्य अडथळे बसविण्यात आलेले आहे.

========================================================

========================================================