वैध मापनशास्त्र यंत्रणेबाबत ग्राहकांकडून वारंवार विचारले जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 12 नोव्हेंबर 2023

विशेष लेख क्र.01                                                                

चला जाणूया शासकीय कार्यालयाचे कामकाज

 राज्य शासनाचे विविध विभाग ठाणे जिल्ह्यात कार्यरत आहेत. या विभागांमध्ये कोणकोणती कामे चालतात, सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या कामांसाठी कोणाशी संपर्क साधावा, तक्रारींसाठी कुठे संपर्क साधावा आदी माहिती नागरिकांना हवी असते. ती माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने विविध विभागांची माहिती देण्यात येत आहे. आज आपण जाणूया वैध मापन शास्त्र विभागाची माहिती…

 उपनियंत्रक, वैध मापन शास्त्र कार्यालय, ठाणे

वैध मापनशास्त्र यंत्रणेबाबत ग्राहकांकडून वारंवार विचारले जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे

वैधमापन शास्त्र यंत्रणा काय काम करते ? :-

वैधमापनशास्त्र ही यंत्रणा महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग या मंत्रालयीन विभागाअंतर्गत कार्यरत आहे. सदर यंत्रणेमार्फत वैध मापनशास्त्र अधिनियम २००९ व त्या अतंर्गत नियमातील तरतुदींच्या अंमलबजावणीचे कामकाज केले जाते. सदर कायद्याअंतर्गत व्यापारी / उद्योजक यांच्याकडे वापरात असलेले वजने मापे यांची विहित कालावधीमध्ये अचुकता तपासून पडताळणी प्रमाणपत्र दिले जाते. तसेच आवेष्टित वस्तूंवर आवश्यक त्या घोषणा, जादा दराने विक्री, वजन मापात कमी देणे याबाबत तपासणी करून कारवाई करण्यात येते.

वस्तू वजन मापात वस्तू कमी दिल्यास कोठे तकार करावी ? :-

या यंत्रणेकडे असलेल्या ग्राहक निवारण कक्षातील दूरध्वनी व ई-मेल वर तक्रार दाखल करू शकता.

वजन काटा बरोबर आहे हे कसे ओळखावे ? :-

या यंत्रणेकडून वजन काट्याची नियमित तपासणी करून त्याच्या अचूकतेबाबत पडताळणी प्रमाणपत्र दिले जाते. अधिकाऱ्यांकडून संबंधित काट्यावर सिल करून त्याबाबत मोहर उमटवली जाते.

मिठाईचे वजन बॉक्ससहित देणे योग्य आहे काय ? :-

मिठाईचे वजन बॉक्ससहित देणे कायद्याचे उल्लंघन आहे. त्यामुळे मिठाई खरेदी करतेवेळी मिठाईचे वजन बॉक्ससहित केले जात नाही याची खात्री करावी.

पेट्रोलपंपावर इंधन अचूक मिळते हे कसे ओळखावे ? :-

पेट्रोल पंपावर इंधन कमी मिळत असल्याची शंका आल्यास डिलरकडे ठेवण्यात आलेल्या 5 लीटरच्या प्रमाणित मापाने आपण डिलिव्हरी तपासू शकता व काही शंका असल्यास या कार्यालयाकडे तक्रार दाखल करू शकता.

आवेष्टित वस्तूवर कंपनीचे नाव, पत्ता, किंमत, ग्राहक तक्रार क्रमांक इ. लिहिणे कायद्याने बंधनकारक आहे का? :-

होय, कायद्याने बंधनकारक आहे. आवेष्टित वस्तूवर, उत्पादकाचे / आयातदाराचे नाव व पूर्ण पत्ता, वस्तुचे नाव, उत्पादन महिना व वर्षे, वस्तूचे निव्वळ वजन, किंमत (सर्व करांसहित) ग्राहक तक्रार क्र. व ई-मेल पत्ता इ. बाबी लिहिणे कायदयाने बंधनकारक आहे.

आवेष्टित वस्तू छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करता येते का ? :-

आवेष्टित वस्तू ही छापिल किंमत अथवा त्यापेक्षा कमी दराने खरेदी करावी. छापिल किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे.

पॅकबंद दुध, आईस्क्रीम, थंड पेय इ. वस्तू कुलींग चार्जेसच्या नावाखाली जास्त दराने विक्री करता येतात काय? :-

कोणत्याही पॅकबंद वस्तूवर कमाल किरकोळ विक्री किंमत ही सर्व करांसहित नमुद केलेली असते. त्यामुळे थंड करून विकण्यात येणाऱ्या आवेष्टित वस्तुंची देखील छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणे कायदयाने गुन्हा आहे.

वस्तू खरेदी करत असताना वजन मापात कमी देणे, छापिल किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणे, छापिल किंमतीत खाडाखोड करणे तसेच व्यापारी/उद्योजक यांच्याकडे वापरात असलेली वजने मापे यांच्या अचुकतेबाबत काही शंका आल्यास या विभागाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. वरीलप्रमाणे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आपले समाधान न झाल्यास मा. नियंत्रक, वैध मापनशास्त्र, महाराष्ट्र राज्य, ७ वा मजला, महानगर टेलिफोन निगम बिल्डिंग क्र. १, हुतात्मा स्मारक चौक, एम. जी. रोड, मुंबई-४००००१ यांच्याकडे आपणास दाद मागता येईल.

बातमी वाचा : स्वच्छतेसाठी शिस्त हवी

अधिक माहितीसाठी

सि.सा.कदम  उपनियंत्रक, वैध मापन शास्त्र, ठाणे जिल्हा.

नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. ०२२-२२६२२०२२ ई-मेल पत्ता – dclmms@yahoo.in

 संकलन :-जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद व जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे

========================================================

========================================================