अनुभवी अधिकारी, कर्मचारी यांची सेवानिवृत्ती ही एक प्रकारे संस्थेची हानी – आयुक्त राजेश नार्वेकर

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 1  नोव्हेंबर 2023

सेवानिवृत्ती ही प्रत्येक कर्मचा-याच्या जीवनातील अपरिहार्य बाब असते. मात्र अनुभवी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने त्या संस्थेच्या कामकाजात अशा कर्मचा-यांची कमतरता जाणवते. यामुळे अनुभवसंपन्न कर्मचारी सेवानिवृत्त  होणे ही एकप्रकारे त्या संस्थेची हानी असून ही हानी भरुन निघायला काही कालावधी जातो असे सांगत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी चांगले कार्यक्षम अधिकारी आज सेवानिवृत्त्‍ होत असून हा संमिश्र भावनांचा समारंभ असल्याचे मत व्यक्त केले. ऑक्टोबर महिन्यात सेवानिवृत्त होणा-या 8 अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती समारंभप्रसंगी आपल्या मनोगतात आयुक्तांनी सेवानिवृत्त होणा-या अधिकारी – कर्मचारी यांच्या कामाविषयीच्या आठवणी सांगत त्याच्या कार्यक्षमतेबद्दल गौरवोद्गार काढले.

बातमी वाचा : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच विकासकामे वेळेत पूर्ण करा

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले व विजयकुमार म्हसाळ, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, शहर अभियंता संजय देसाई, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त ललिता बाबर, शिक्षण विभागाचे उपआयुक्त  दत्तात्रय घनवट, सहा.संचालक नगररचना सोमनाथ केकाण, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, अतिरिक्त शहर अभियंता  मनोज पाटील व शिरीष आरदवाड आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

ऑक्टोबर महिन्यात सेवानिवृत्त होणारे नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी सहा.आयुक्त महेंद्र सप्रे, कार्यकारी अभियंता सुनिल लाड, प्रशासकीय अधिकारी अरविंद उरसळ, सुधाकर लोहार, रोहिदास जाधव तसेच मुख्याध्यापक  व्यंकटेश कांबळे, प्राथमिक शिक्षक कामिनी आंग्रे व  पद्माकर पाटील अशा 8 कर्मचा-यांचा आयुक्तांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र प्रदान करुन विशेष गौरव करण्यात आला.

बातमी वाचा : नवी मुंबईकरांसाठी विभागनिहाय 6 ते 7 तास पाणीपुरवठा करण्याचा आराखडा

यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात सत्काराला उत्तर देताना सहा.आयुक्त महेंद्र सप्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिका या आपल्या संस्थेप्रती निष्ठा बाळगून सोपविलेले काम प्रामाणिकपणे पार पाडले याचे सेवानिवृत्त होत असताना अतिशय समाधान वाटते असे सांगत नवी मुंबईच्या नावलौकिकात आपल्याही कामाचा खारीचा वाटा देता आला याचा आनंद आहे असे मत व्यक्त केले. प्रत्येक कर्मचा-याने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी व संस्थेच्या हिताला प्राधान्य देऊन काम करावे असेही आवाहन त्यांनी उपस्थित अधिकारी – कर्मचारीवृंदाला केले. आयुक्त महोदयांच्या मनोगतात सेवानिवृत्त होणा-या आम्हां कर्मचा-यांच्या कामाचे विश्लेषण ऐकून केलेल्या कामाचे चीज झाल्याचे समाधान वाटले असेही महेंद्र सप्रे म्हणाले.

बातमी वाचा : स्वच्छतेसाठी शिस्त हवी

यावेळी अतिरिक्त्‍ आयुक्त सुजाता ढोले व विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता संजय देसाई, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, विधी अधिकारी अभय जाधव, प्रशासकीय अधिकारी रवी जाधव यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त करीत सेवानिवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचा-यांसोबतच्या कार्यालयीन कामकाजातील संस्मरणीय आठवणींना उजाळा दिला. प्रशासकीय अधिकारी अरविंद उरसळ व  सुधाकर लोहार आणि मुख्याध्यापक व्यंकटेश कांबळे यांनीही सत्काराला उत्तर देताना आमच्या सेवानिवृत्तीप्रसंगी सभागृहात  हाऊसफुल्ल उपस्थितीबद्दल सहकारी अधिकारी, कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले.

========================================================

========================================================