सरदार वल्लभभाई पटेल व प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांना नमुंमपामार्फत अभिवादन
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 31 ऑक्टोबर 2023
थोर स्वातंत्र्यसेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि माजी पंतप्रधान प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त नमुंमपा मुख्यालयातील ॲम्फीथिएटरमध्ये अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार म्हसाळ यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून या महामानवांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, शहर अभियंता संजय देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, शिक्षण विभागाचे उप आयुक्त दत्तात्रय घनवट, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, कार्यकारी अभियंता सुनिल लाड, विधी अधिकारी अभय जाधव, सहा आयुक्त चंद्रकांत तायडे व राजेंद्र चौगुले आणि इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीने आणि कार्याने साध्य झालेल्या राष्ट्रीय ऐक्यासाठी शपथ घेत असल्याचे घोषित करीत माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा जतन करण्यासाठी योगदान देण्याचा गांभीर्यपूर्वक निश्चय करीत असल्याची सामुहिक शपथ ग्रहण केली. त्याचप्रमाणे प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार यांच्यासमवेत राष्ट्रीय संकल्प दिनाची सामुहिक शपथही ग्रहण करण्यात आली.
यावेळी 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत शासनाने घोषित केलेल्या ‘दक्षता जनजागृती सप्ताह (Vigilance Awarness Week)’ निमित्त ‘भ्रष्टाचाराला नाही म्हणा, राष्ट्रासाठी वचनबध्द व्हा’ या संकल्पनेनुसार भ्रष्टाचार निमुर्लनाची सामुहिक शपथ मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांच्यासमवेत ग्रहण करण्यात आली.
========================================================
========================================================