लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच विकासकामे वेळेत पूर्ण करा

ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 26 ऑक्टोबर 2023

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 1 मार्च 2024 नंतर केव्हाही लागण्याची शक्यता असल्याने तत्पूर्वी विकास कामे पुर्ण करणे तसेच प्रस्तावित काही कामांचे कार्यादेश होवून कामे सुरू करणे  गरजेचे आहे. आचारसंहितेपूर्वीचा मर्यादित कालावधी लक्षात घेवून ठाणे शहरात सद्यस्थ‍ितीत सुरू असलेली रस्ते, शौचालय, शाळा इमारत दुरूस्ती तसेच शहर स्वच्छतेच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना आदी सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. तसेच नव्याने करण्यात येणाऱ्या प्रस्तावित कामांच्या निविदा प्रसिद्ध करुन सदरची कामे देखील फेब्रुवारी 2024 पूर्वी सुरू होतील या दृष्टीने नियोजन करावे असे  निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित विभागाला व सर्व कार्यकारी अभियंता यांना दिले.

बातमी वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वंचितच्या शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

यूटीडब्ल्यूटी, सिमेंट काँक्रिटीकरण तसेच डांबरी रस्त्यांची कामे  करत असताना कामाचा दर्जा चांगला राहिल याकडे कटाक्ष ठेवावा.कोणत्याही परिस्थितीत दोष निवारण कालावधीतील रस्ता दुरूस्त करण्याची वेळ आली तर तो संबंधित कंत्राटदाराच्या खर्चानेच दुरूस्त करण्यात यावा अशा सूचनाही आयुक्त बांगर यांनी या बैठकीत दिल्या. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या 214 कोटी व 391 कोटी या दोन टप्प्यामध्ये हाती घेण्यात आलेल्या रस्त्यांची कामे आचार संहितेपूर्वी किंबहुना कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

बातमी वाचा : मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

ठाण्याच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या दीपमाळांचे काम दिवाळीपूर्वी होईल या दृष्टीने करुन घेण्यात यावे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, गडकरी रंगायतन, नाल्यावर जाळी बसविणे, टेमघर पाणी शुद्धिकरण केंद्रातील  अत्यावश्यक कामे, खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल आदी कामांची निविदा प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करुन कामाचे कार्यादेश लवकरात लवकर द्यावेत अशा सूचना आयुक्त बांगर यांनी यावेळी दिल्या. कळवा येथील पाण्याचे जलकुंभ  तीन टाक्या तसेच खारीगांव येथील एसटीपी प्लांट कार्यान्वित करण्याबाबतही यावेळी आयुक्तांनी सूचित केले.

बातमी वाचा : नवी मुंबई विमानतळ बाधितांसाठी सिडकोतर्फे भूखंडाचा ताबा दिल्यापासून ६ वर्षांचा बांधकाम कालावधी मंजूर

घनकचरा विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामांपैकी रस्ते साफसफाईच्या कामाचे कार्यादेश होवून कामे सुरू करण्यात आलेली आहे. डोअर टू डोअर कलेक्शन, यांत्रिकी पध्दतीने रस्त्यांची साफसफाई, शौचालयांची स्वच्छता, कंटेनर टॉयलेटची निगा व देखभाल, दिवा डंपिग ग्राऊंड येथील जागा संपूर्णत: कचरामुक्त करण्यासाठी  बायोमायनिंग प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या कामाचे कार्यादेश फेब्रुवारी महिन्यापूर्वी होवून प्रत्यक्षात काम सुरू  होणे गरजेचे आहे. तसेच अमृत योजनेतंर्गत हाती घेण्यात आलेल्या 16 तलावांची कामे मे 2024 पर्यत पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त  बांगर यांनी दिल्या.

बातमी वाचा : नैना क्षेत्रातील गृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस २७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

 विद्युत विभागामार्फत संपूर्ण शहरभर जुने सोडियमवेपर दिवे बदलून नवीन एलईडी दिवे बसविण्याचे काम सध्या निविदास्तरावर असून या कामांचा कार्यादेश लवकरात लवकर पूर्ण करुन सदर कामे फेब्रुवारी 2024 पूर्वी पूर्ण होतील या दृष्टीने नियोजन करावे.

नवीन उद्याननिर्मितीसाठी भांडवली खर्चातंर्गत शासनाकडून 60 कोटी रुपये शासनाकडून महापालिकेस प्राप्त झाले आहेत, याचाही आराखडा तयार करण्यात यावा अशा सूचनाही या बैठकीत दिल्या.  उद्यानांमध्ये असणारी शौचालयातील आवश्यक कामे ही उद्यान विभागामार्फतच करण्यात यावीत असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले तसेच  स्मार्टसिटीअंतर्गत वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटचे काम केलेले आहे, ते उद्यानविभागाने हस्तांतरीत करुन घ्यावेत असेही निर्देश यावेळी देण्यात आले. जाहिरात कंत्राटदाराला जी कामे देण्यात आली होती ती अद्याप झालेली नसून यासंदर्भात संबंधित जाहिरात कंत्राटदारास नोटीस काढण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.

शासन निधीचा योग्य विनियोग करा

विविध विकास कामांसाठी शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीचा अत्यंत सुयोग्य पध्दतीने विनियोग होईल याकडे कटाक्ष असावा. जर प्रस्तावित कामे पूर्ण होवून निधी शिल्लक राहिल्यास उर्वरित निधी शासनाकडे पाठविला जाईल असेही आयुक्त  बांगर यांनी नमूद केले.

या बैठकीस उपायुक्त तुषार पवार, उपनगर अभियंता विकास ढोले, रामदास शिंदे यांच्यासह प्रभागसमिती स्तरावरील सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

========================================================

========================================================