- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 28 सप्टेंबर 2023
डोळे हे निसर्गाने मानवाला दिलेली अमूल्य देणगी आहे. आपल्या डोळ्यांनी आपण हे सुंदर जग पाहतो, निसर्गातले रंग अनुभवत असतो. आपल्या इतर अवयवांचा विचार केला तर तब्बल ८२ टक्के ज्ञान आपल्याला डोळ्यांमुळे मिळते. इतका महत्वाचा अवयव असलेला हा डोळा त्यामुळे वेगळा ठरतो. या डोळ्यांना कधी काही दुखापत झाली तर आपण परावलंबी होवून जातो. मग ज्यांना अंधत्व आहे असा व्यक्तिंना आपण हे जग पाहण्यासाठी मदत करू शकतो. त्यासाठी नेत्रदानाचा पर्याय वापरला जातो. मोतीबिंदू, काचबिंदू, बुबुळाच्या काही आजारामुळे अंधत्व येते.
हा लेख वाचा : नाचणी, बाजरी, ज्वारी खा अन् तंदुरुस्त राहा !
एका अभ्यासानुसार भारतात जवळपास सव्वा कोटी नागरिकांना नेत्रबुबुळाची गरज आहे. भारतात साधारण दरवर्षी ७० ते ९० लाख लोकांचा मृत्यू होतो. त्याप्रमाणे विचार केला तर केवळ ७० हजार डोळे दरवर्षी मिळतात. हे प्रमाण फारच कमी आहे. नेत्रदानाविषयीची जनजागृती कमी प्रमाणात असल्याने उपलब्ध होणारे डोळे मिळतात गरज यामध्ये फार अंतर आहे.
- नेत्रदान म्हणजे काय ?
बुबुळ म्हणजे कॉर्निया. हा डोळ्यांचा सर्वात बाहेरचा भाग आहे. हे संपूर्ण पारदर्शक असते. काही कारणाने जेव्हा हे अंधूक होते किंवा याची पारदर्शकता कमी होते आणि त्यातून प्रकाश डोळ्यांत शिरू शकत नाही. अशावेळी जे अंधत्व येते ते बुबुळामुळे आलेले अंधत्व असते. हे अंधत्व दूर करता येत नाही. यावरचा पर्याय म्हणजे मृत व्यक्तिचे बुबुळ काढून या व्यक्तिला बसवणे. या प्रक्रियेला नेत्रदान किंवा नेत्र प्रत्यारोपण असे म्हणतात. मृत्यूनंतर ६ तासांत नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते.
ही बातमी वाचा : भारतात आता 12 ब्लू फ्लॅग बीच
जेव्हा एखादी व्यक्ती नेत्रदान करते तेव्हा त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिचे केवळ बुबुळ काढले जाते. बुबुळ काढल्यानंतर तिथे कोणताही खड्डा पडत नाही. समाजामध्ये नेत्रदानाविषयी खूप गैरसमज आहेत. त्यातला एक म्हणजे नेत्रदान केल्यानंतर तिथे खड्डा पडतो आणि मृतदेह विद्रुप दिसू लागतो मात्र प्रत्यक्षात बुबुळ काढल्यानंतर तिथे कोणताही खड्डा पडत नाही. नेत्रदान हे महत्वाचे का आहे तर यापूर्वी नेत्रदानात एक दाता दोन लोकांना दृष्टी देवू शकत होता. आता मात्र एक दाता 4 जणांना दृष्टी देवू शकतो.
- नेत्रदान कोण करू शकतो ?
वय वर्षे 1 ते वय वर्षे 100 पर्यंत कोणाही व्यक्ती नेत्रदान करू शकते.
मधुमेह, मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली असली तरी नेत्रदान करता येते. केवळ बुबुळ पारदर्शक असणे आवश्यक आहे.
कर्करोग, क्षय, एचआयव्ही बाधित अशा संसर्गजन्य रोगांच्या रूग्णांना नेत्रदान करता येत नाही.
- नेत्रदानासाठी काय करावे लागते
नेत्रदान करण्याची इच्छा असल्याचे संबंधित व्यक्ती आपले नाव शासकीय दवाखान्यात किंवा नेत्रपेढीत नोंदवू शकते.
तिथे तुम्हाला एक कार्ड दिले जाते. हे कार्ड आपल्या मृत्यूनंतर आपल्या नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तींना दाखवून ठेवा. आपल्या मृत्यूनंतर सहा तासांच्या आत या कार्डावरील क्रमांकावर नातेवाईकांनी संपर्क साधावा.
कार्ड काढले नसेल मात्र आपली इच्छा नातेवाईका़ना सांगितली असेल तरी नेत्रदान करता येते.
मृत्यूनंतर ज्या खोलीत मृतदेह आहे अशा खोलीतले पंखे बंद करून मृतदेहाच्या डोळ्यांवर ओलसर पट्टी ठेवा.
मानेखाली उशी ठेवावी.
ही बातमी वाचा : पडीक जमिनीवर जंगल फुलवणारा नायक
नेत्रपेढीतील तंत्रज्ञ बुबुळ जमा करून घेवून जातात त्यानंतर नेत्र बुबूळ घेतल्यानंतर त्याची प्रतवारी ठरवली जाते. त्यानंतर ते कोणत्या आजारासाठी उपयोगी पडू शकतात हे ठरवले जाते. त्यानुसार नेत्रपेढी आपल्याकडे बुबुळ देत असते.
ज्यांचे बुबूळ पांढरे झाले आहे पण डोळा चांगला आहे अशांनाच नेत्रदानाचा फायदा होतो. पडदा फाटणे, डोळा फुटला आहे, डोळा लहान असणे, इतर आजार असणे यामध्ये नेत्रदानाचा फायदा होत नाही.
प्रत्येक व्यक्तीला हे जग पाहायला मिळतेच असे नाही. निसर्गाने ज्यांची दृष्टि हिरावून घेतली आहे अशा व्यक्ती नेत्रदानामुळे जग पुन्हा पाहू शकतता. मग हे जग पाहायला मिळावे यासाठी नेत्रदान तर महत्वाचे आहेच.
========================================================
========================================================