मालमत्ताकर वसूलीचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून गतीमान कार्यवाही करा

नवी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांचे निर्देश

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 26 सप्टेंबर 2023

मालमत्ता कर हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असून यामधून प्राप्त होणाऱ्या महसूलातूनच महानगरपालिका क्षेत्रातील नागरी सेवासुविधा दर्जेदारपणे पुरविणे शक्य होते. त्यामुळे नमुंमपा आयुक्त  राजेश नार्वेकर यांचे मालमत्ताकर वसूली कार्यवाहीकडे बारकाईने लक्ष आहे. या अनुषंगाने मालमत्ताकर विभागाच्या प्रमुख तथा अतिरिक्त‍ आयुक्त‍ (1) सुजाता ढोले यांनी मालमत्ताकर विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांची विशेष बैठक घेत वसूलीचा विभागनिहाय लक्ष्यांक देत गतीमान कार्यवाहीचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे जे कर्मचारी कामात हलगर्जीपणा करताना आढळतील त्यांच्यावर  प्रशासकीय कारवाई करण्याचेही स्पष्ट संकेत यावेळी देण्यात आले.

ही बातमी वाचा : Navi Mumbai Morbe Dam: जलपूजनाचा वाद चिघळला

दर आठवडयाला कर्मचा-यांनी केलेल्या कामाचा स्वत: आढावा घेणार असल्याचे सांगत त्यांनी शहर विकासात मालमत्ताकराचे महत्व लक्षात घेऊन प्रत्येकाने टारगेट नजरेसमोर ठेवून काम करा अशा स्पष्ट सूचना दिल्या. कामात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा चालणार नाही असेही त्यांनी निर्देशित केले.

विदयमान आर्थिक वर्षात अर्थसंकल्प सादर करताना आयुक्तांनी मालमत्ताकर विभागास 800 कोटी रक्कमेचे उद्दिष्ट दिलेले आहे. त्यानुसार मालमत्ताकर विभाग वर्तमान वर्षातील करवसूलीप्रमाणेच थकबाकीदार मालमत्ताकर धारकांकडून थकीत मालमत्ताकर वसूली करण्याकडेही विशेष लक्ष देत आहे. या अनुषंगाने मोठया रक्कमेची थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांपासून उलटया क्रमाने थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात मोठ्या रक्कमेच्या थकबाकीदारांकडील वसूलीला प्राधान्य देण्यात येत आहे.

या आर्थिक वर्षात 15 सप्टेंबर 2023 पर्यंत रू. 235 कोटी रक्कमेची मालमत्ताकर वसूली करण्यात आलेली आहे. यामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने थकबाकी वसूलीकडे प्राधान्याने लक्ष दिले जात असून त्यासोबतच नवीन मालमत्ता ह्या मालमत्ताकराच्या कक्षेत आणण्यावर भर दिला जात आहे.

ही बातमी वाचा : 10300 हून अधिक युवक व नागरिकांनी राबवली खारफुटी स्वच्छता मोहीम

अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी या थकबाकीदारांच्या विभागनिहाय याद्यांचा आढावा घेत संबंधित कर्मचारी यांनी दोन दिवस कार्यालयीन कामकाज, दोन दिवस थकबाकी वसूलीचे काम व एक दिवस जप्तीविषयक काम अशी साप्ताहिक कार्यप्रणाली ठरवून घेऊन व तशाप्रकारे आपल्याकडील कामाचे नियोजन करुन थकबाकी वसूलीवर गांभीर्यपूर्वक लक्ष दयावे असे आदेशित केले. यामध्ये निवासी क्षेत्राप्रमाणेच एमआयडीसी भागातील थकबाकी वसूलीवरही लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक विभागाला मालमत्ताकर वसूलीचे उद्दिष्ट निश्चित करुन देत त्याच्या पूर्ततेसाठी संपूर्ण क्षमतेने काम करा व नागरिकांशी सतत संवादी राहून समन्वय राखत पाठपुरावा करा असेही सूचित करण्यात आले.

ही बातमी वाचा : 1 ऑक्टोबरला स्वच्छतेसाठी 1 तारीख 1 तास उपक्रम

मालमत्ताकर विभाग हा महानगरपालिकेतील अत्यंत महत्वाचा विभाग असून या विभागात आपल्याला काम करण्याची संधी मिळाली याचे महत्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी जाणावे व तशा प्रकारचे काम करावे असे सूचित करीत अतिरिक्त आयुक्त‍  सुजाता ढोले यांनी प्रत्येकाने आपली संपूर्ण क्षमता कामात वापरावी असे सांगताना यापुढील काळात प्रत्येकाच्या कामाचे साप्ताहिक मूल्यमापन केले जाईल असे स्पष्ट केले.

========================================================

========================================================