राज्यातले फळांचे पहिले गाव धुमाळवाडी 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 17 सप्टेंबर 2023
 सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातल्या धुमाळवाडी या गावाने राज्यातील पहिले फळांचे गाव होण्याचा मान मिळवला आहे. कृषी विभागाने या गावाला फळांचे गाव म्हणून घोषित केले आहे.
 इथल्या अडीचशे हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर 19 प्रकारच्या फळबागा आहेत. साधारण 200 घरांचे हे गाव असून बहुतांश जमीन डोंगराळ आहे. इथल्या 250 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर फळबागा आहेत. फळबागेसाठी पोषक असणारी जमीन, अनुकूल नैसर्गिक आणि भौगोलिक वातावरणामुळे इथे 1980 मध्ये पहिल्यादा डाळींबाची लागवड करण्यात आली. मात्र तेलकट डाग रोगांमुळे डाळिंबाच्या क्षेत्रात घट होवून शेतकऱ्यांनी अन्य पिके घेण्यास सुरूवात केली.
इथे द्राक्ष, डाळींब, पेरू, सीताफळ, आवळा, अंजीर, केळी, जांभूळ, ड्रॅगन फ्रूट, लिंबू, संत्र,  सफरचंद, यांसारख्या 20 प्रकारच्या फळझाडाची यशस्वी लागवड केली जात आहे. छोटे शेत असलेले शेतकरी बांधावर फळझाडे लावत आहेत. फळबागेसाठी ठिबक सिंचनाचा वापर केला जात असून बहुतांश शेतकरी सेंद्रीय पद्धतीने शेती करत आहेत. दर्जा, गुणवत्ता, चवीमुळे इथल्या फळांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. उत्पादित फळांची बांधावरच थेट विक्री होत असून यातून दरवर्षी सुमारे २५ कोटी रुपयाचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे. फळबागांच्या या यशस्वी प्रयोगामुळे गावातील 70 टक्के युवकांना गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे; आता गावातली ही युवा पिढी फळप्रक्रिया उद्योग उभारणीसाठी पुढे येत आहे.
========================================================

 ========================================================