इर्शाळवाडी दुर्घटनेत मदतकार्य : शासनामार्फत नवी मुंबई महानगरपालिकेस सन्मानपत्र

मदतकार्य पथकातील नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांचा स्वातंत्र्यदिनी विशेष सन्मान

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 18 ऑगस्ट 2023

 इर्शाळवाडी येथील भूस्खलन दुर्घटनेत नमुंमपा आयुक्त्‍ श्री. राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेची अग्निशमन, आरोग्य, स्वच्छता व आपत्ती निवारण पथके मदतकार्यासाठी मध्यरात्रीच घटनास्थळी रवाना झाली. या तत्पर मदतकार्य करणाऱ्या पथकांना प्रातिनिधिक स्वरूपात स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते, महापालिका मुख्यालयातील विशेष समारंभात सन्मानित करण्यात आले.

सदर सन्मानापूर्वी दुर्घटनास्थळी दुर्गम भागात मदतकार्य करण्यासाठी जात असताना आकस्मिक निधन झालेले नमुंमपा अग्निशमन विभागाचे सहाय्यक केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच आपत्ती प्रसंगात धाडसाने मदतकार्य करणारे अग्निशमन अधिकारी  पुरुषोत्तम जाधव व अग्निशमन विभागाचे सहकारी पथक, आपत्ती मदतकार्य व घनकचरा व्यवस्थापन समुहाचे प्रमुख प्रतिनिधी सहा. आयुक्त शशिकांत तांडेल आणि सहकारी पथक तसेच डॉ. सोनल बन्सल व समूह यांचे आरोग्य पथक या पथकांचा प्रातिनिधिक स्वरुपात सन्मान करण्यात आला.

सतत 4 दिवस चाललेल्या या मदतकार्यात एनडीआरएफच्या जवानांसोबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकांनीही दररोज सक्रिय सहभाग घेतला तसेच रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त होणा-या  सूचनांनुसार  नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक ते साहित्य आपद्ग्रस्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आले.

नवी मुंबईतीलच नव्हे तर इतर गाव – शहरातील आपत्ती प्रसंगात नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी नेहमीच मदतकार्य करण्यात पुढाकार घेतलेला आहे. ही परंपरा कायम राखत इर्शाळवाडी दुर्घटनेतही नवी मुंबई महानगरपालिका पथकांनी चांगली कामगिरी केली. याचा अभिमान वाटत असल्याचे नमूद करीत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या पथकांचा प्रातिनिधिक स्वरुपात सन्मान केला. पथकात सहभागी सर्वच अधिकारी, कर्मचारी यांस लवकरच प्रशस्तीपत्रे प्रदान करुन त्यांचा कामगिरीचा गौरव करण्यात येईल असेही आयुक्तांनी सांगितले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या तत्पर मदतकार्य सेवेबद्दल रायगड जिल्ह्यामार्फत खालापूरचे तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्यामार्फत विशेष सन्मानपत्र स्वातंत्र्यदिनाच्याच दिवशी अभिनंदनपूर्वक प्रदान करण्यात आले.

      नवी मुंबई महानगरपालिकेच्या तप्तर मदतकार्याची दखल विशेष सन्मानपत्राव्दारे शासनामार्फत घेण्यात आली असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते स्वातंत्र्यदिनी या मदतकार्य पथकांचा विशेष गौरव करण्यात आला. या मदतकार्य पथकातील प्रत्येक अधिकारी व कर्मचा-यास व्यक्तिगत प्रशस्तीपत्रकही दिले जाणार आहे.

========================================================

========================================================