ठाणे महापालिका रुग्णालयात एकाच रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू

दोषींवर कठोर कारवाई करणार -आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 13 ऑगस्ट 2023

ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येतील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत सुमारे 18 रुग्णांचा उपचारादरम्यन मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. या घटनेनंतर ठाणे शहरात एखच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच याच रुग्णालयात पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ही घटना उघडकीस आल्यामुळे महापालिका प्रशासन तसेच रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रुग्णालयात प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरा डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी वर्ग असल्यामुळे  एकाच रात्रीत या 18 जणांना जीव गमवावा लागल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे.तर यातील 13 रुग्ण हे आय सी यू मधील तर चार रुग्ण जनरल वॉर्ड मधील होते. तसेच या रुग्णांना शेवटच्या क्षणी आणले असल्याचा खुलासा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

रुग्णालय प्रशासनाने या वृत्ताला दुजोरा देताना काही रुग्ण खासगी हॉस्पिटलमधून शेवटच्या क्षणी आल्याने, काही रुग्ण वयस्कर असल्याने मृत्यू झाल्याचा दावा केला  आहे.

शहरातील सिव्हील रुग्णालय बंद झाल्यापासून सर्व ठाणे जिल्ह्यातील रुग्ण याच रुग्णालयात उपचारांसाठी धाव घेत आहेत. मात्र डॉक्टर तसेच वैद्यकीय यंत्रणांवर अधिक तणाव पडत असल्याचे सांगण्यात येते.त्यामुळे 10 ऑगस्टला एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी ठाण्यातील राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रुग्णालयात जाऊन प्रशासनाला जाब विचारला होता. मात्र तरीही अशाप्रकारची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना पसरली आहे.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्हयात विशेषतः ठाणे महानगरपालिकेच्या रुग्णालयात एवढी मोठी घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

  • दोषींवर कठोर कारवाई करणार- आरोग्यमंत्री तानाजी सावंत

ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या कळवा येथील रुग्णालयात जी घटना घडली, ती अत्यंत दुर्दैवी आहे. अश्याप्रकारे रुग्णाच्या जीवाशी झालेली हेळसांड आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, येत्या दोन दिवसात या प्रकरणाचा अहवाल येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

ठाणे महापालिकेचे आयुक्त, आरोग्य अधिकारी यांच्याकडून याप्रकरणात नेमके काय घडलं हा विषय समजून घेऊ, त्यानंतर दोन दिवसात त्याचा अहवाल प्राप्त झाला की, त्यातील दोषींवर मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

========================================================

========================================================