वाहतूक कोंडीत अडकले आणि लोकल ट्रेनने मुंबईला निघाले
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 25 जुलै 2023:
मुंबई आणि परिसरात गेले काही दिवस पाऊस सुरू आहे. सततच्या आणि कधी मुसळधार बरसणा-या पावसामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीत अडकलेले नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी विधिमंडळात पोहोचण्यासाठी शेवटी लोकलचा प्रवास केला. आणि या प्रवासादरम्यान त्यांनी अनुभवलेला मुंबईकरांचा रस्ते, लोकल प्रवास ट्विटरवर शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी #शहर_विकास हा हॅशटॅग वापरत मुंबईकरांबद्दल प्रचंड आदर व्यक्त केला.
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे भिवंडीजवळ वाहतूक कोंडीत अडकले. अखेर विधिमंडळात पोहोचण्यासाठी त्यांनी कसेबसे कल्याण गाठले आणि पुढे एसी लोकलने मुंबईपर्यंतचा प्रवास केला. सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. सत्यजीत तांबे यांनी या अधिवेशनात विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. सोमवारीही ते संगमनेरहून अधिवेशनासाठी गाडीने निघाले होते. मात्र नाशिक-मुंबई हायवेवर भिवंडीजवळ ते तीन ते चार तास वाहतूक कोंडीत अडकले. त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात की, शेवटी मित्राने कल्याणवरून लोकल ट्रेनने मुंबई गाठण्याचा सल्ला दिला. मात्र, भिवंडी बायपासवरून कल्याणपर्यंतचे ३० मिनिटांचे अंतर कापायलाही त्यांना तीन तास लागले. शेवटी कल्याणवरून त्यांना एसी लोकल मिळाली.
जनता किती सहनशील आहे!
या एसी लोकलमध्ये बसल्यावर त्यांनी स्वत:चा फोटो काढत ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये त्यांनी #शहर_विकास हा हॅशटॅग वापरत मुंबईकरांबद्दल प्रचंड आदर व्यक्त केला. ते म्हणतात, मुंबई महानगर प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या पालघरपासून पनवेलपर्यंत आणि कल्याण-डोंबिवलीपासून मुंबईपर्यंत सर्व जनतेविषयी आज माझ्या मनातील आदर प्रचंड वाढला. ही जनता किती सहनशील आहे! त्यापुढे त्यांनी राज्याच्या राजधानीभोवती असलेल्या पायाभूत सुविधांबाबतही प्रश्नचिह्न उपस्थित केलं. मुंबईच्या अवतीभवती पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. माणसांच्या जीवनशैलीची ऐशी-तैशी झाली आहे. तरीही लोकांची सहनशीलता कायम आहे, असंही ते ट्वीटमध्ये म्हणाले.
- ट्वीटवर लोकांच्या प्रतिक्रिया
आ. सत्यजीत तांबे यांच्या या ट्वीटवर लोकांनीही मनापासून प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्वसामान्यांच्या जीवनातील अतिशय जिव्हाळ्याच्या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल एका युजरने आ. तांबे यांचं अभिनंदन केलं. तसंच त्यांनी हा मुद्दा अधिवेशनात मांडावा, अशी विनंतीही केली. आणखी एक युजरने ‘तरी बरे, लोकलमध्ये अडकला नाहीत. नाहीतर मुंबईकरांच्या संयमाची परीक्षाही तुम्हाला देता आली असती’, असं मत मांडलं. तुम्ही जनतेचा त्रास समजून घेतलात आणि त्यावर व्यक्त झालात. लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे जनतेच्या यातना समजून घेतल्या, तर खूप बरं होईल. तुम्ही यावर नक्की आवाज उठवाल, अशी अपेक्षाही काहींनी व्यक्त केली. जेवढा विकास झाला, तेवढीच वाहतूक कोंडीची समस्याही मोठी झाली, असंही काहींनी आ. तांबे यांच्या निदर्शनास आणून दिलं. विशेष म्हणजे आपल्या समस्या जाणून घेणारा कोणीतरी लोकप्रतिनिधी आहे आणि तो या समस्यांवर विधिमंडळात नक्कीच आवाज उठवेल, अशी शाश्वती आ. तांबे यांच्याशी थेट संबंध नसलेल्या लोकांनाही वाटते, ही बाब यातून अधोरेखित झाली.
========================================================
===============================================