विभाग स्तरावरील कार्यक्रम, संदर्भसमृद्ध प्रकाशने, माहितीपट निर्मिती याद्वारे साजरा होणार महाराष्ट्र विधानपरिषद शतकोत्तर महोत्सव

विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सूचना

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 19 जुलै 2023

महाराष्ट्र विधानपरिषदेचा शतकोत्तर महोत्सव परिसंवाद, प्रदर्शने, संदर्भसमृद्ध प्रकाशने याद्वारे संस्मरणीय ठरेल अशा पद्धतीने साजरा करण्यात यावा, माजी ज्येष्ठ सदस्यांनाही या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होता यावे यासाठी विभागस्तरावर देखील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. अशी सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि संसदीय कार्य मंत्री  चंद्रकांत पाटील यांनी केली.

१८ जुलै रोजी विधानभवनातील कक्ष क्रमांक १४५ मध्ये विधानपरिषदेचा शतकोत्तर महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यासंदर्भात विचार – विनिमय आणि नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती  नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेतील गटनेते आणि सदस्यांची बैठक बोलावली होती.

यावेळी, माजी सदस्यांना विनंती पत्रे पाठवून त्यांच्याकडून विधानपरिषदेसंदर्भातील महत्वपूर्ण घटना आणि छायाचित्रे मागविणे, देशातील अन्य राज्यांमधील विधानपरिषद सदस्यांना चर्चा – परिसंवादासाठी निमंत्रित करणे, कायदानिर्मितीच्या दृष्टीने महत्वपूर्ण चर्चा, संदर्भांचे संकलन पुस्तक स्वरूपात करणे, वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि योगदान यासंदर्भातील मान्यवरांचे लेख, सभागृहातील चर्चा इत्यादींचे संदर्भ संकलित आणि संपादित करणे, या शतकोत्तर महोत्सव उपक्रमांमध्ये समाजातील विविध घटकांना सहभागी करून घेणे, निवृत्त सदस्यांना निरोप देतानाच्या छायाचित्रांचे पुस्तक स्वरूपात संकलन करणे, माहितीपट निर्मिती इत्यादी सूचना याबैठकीत गटनेते आणि सदस्यांनी मांडल्या. या सूचना स्वीकारण्यात येऊन विषयांनुसार समिती नेमण्यात येऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निश्चित केले.

या बैठकीस, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे,  प्रवीण दरेकर, सतेज उर्फ बंटी पाटील, शशिकांत शिंदे, विजय उर्फ भाई गिरकर, जयंत पाटील, कपिल पाटील, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, सुरेश धस, प्रा. मनिषा कायंदे, सत्यजित तांबे, अरुण लाड, अमोल मिटकरी, नरेंद्र दराडे,  रामराजे नाईक निंबाळकर (दूरदृष्यप्रणालीद्वारे), महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव(२) विलास आठवले, उपसचिव  राजेश तारवी,  ऋतुराज कुडतरकर,  सायली कांबळी,  पुष्पा दळवी, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, उपग्रंथपाल शत्रुघ्न मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

========================================================

========================================================