- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 5 जुलै 2023
नवी मुंबई महापालिकेत कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत मंत्रालयीन पातळीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करीत नवी मुंबई काँग्रेसचे नेते आणि नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. नवी मुंबई काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या ठिय्या आंदोलनामुळे मंत्रालयात खळबळ उडाली.
नवी मुंबई महापालिकेच्या सेवेत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबतच्या अनेक फायली मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या टेबलावर धूळ खात पडलेल्या आहेत. याप्रकरणी पाठपुरावा करूनही वरिष्ठ पातळीवरचे अधिकारी दाद देत नसल्यामुळे कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने थेट मंत्रालय गाठले. रविंद्र सावंत यांनी अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु भेट न झाल्यामुळे रविंद्र सावंत यांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या केबिनबाहेरच शिष्टमंडळासह ठिय्या मारला. जोपर्यंत अधिकारी भेटून आमचे प्रश्न जाणून घेत नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नाही, असा पवित्रा सावंत यांनी घेतला. सावंत यांच्या ठिय्या आंदोलनामुळे मंत्रालयात खळबळ उडून अधिकाऱ्यांनी तातडीने रविंद्र सावंत यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी धाव घेतली आणि त्यांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा घडवून आणली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेतल्याची माहिती रविंद्र सावंत यांनी दिली.
दरम्यान,नवी मुंबई महापालिकेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या अनेक मागण्यांबाबत मंत्रालयीन पातळीवर सकारात्मक निर्णय लवकरात लवकर न घेतल्यास तीव्र आंदोलने छेडण्याचा इशारा कामगार नेते रविंद्र सावंत यांनी दिला आहे.
========================================================