स्वच्छतेला हातभार लावणा-या ‘रिसायकल बाजार’ संकल्पनेचा आयुक्तांच्या हस्ते शुभारंभ
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 26 मे 2023
डी मार्टमध्ये थ्री आर संकल्पनेअंतर्गत रिसायकल मार्ट सुरु करण्यात आले असून याच धर्तीवर आज नवीन सेक्टर 50 सीवूड नेरुळ येथील अपना बाजारमध्ये ‘रिसायकल बाजार’चा शुभारंभ महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी शशिकांत तांडेल आणि इतर महापालिका अधिकारी उपस्थित होते.
या रिसायकल बाजारमध्ये नागरिकांनी त्यांच्याकडील रिकाम्या प्लास्टिक बॉटल्स, तेलाचे कॅन, प्लास्टिकच्या इतर वस्तू, काचेचे सामान अशा वापरलेल्या निरुपयोगी वस्तू दिल्यानंतर त्यांना त्या बदल्यात पॉईंट्स देऊन त्या पॉईंट्सच्या किंमतीएवढी रक्कमेची सूट खरेदी केलेल्या साहित्यावर देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे.
अपना बाजारच्या प्रवेशव्दारानजीक रिसायकल बाजारचा स्वतंत्र काऊंटर ठेवण्यात आला असून नागरिक त्याठिकाणी आपल्याला नकोशा असलेल्या घरातील टाकाऊ वस्तू आणून देऊ शकतात व त्याबदल्यात पॉईट्स मिळवून खरेदी केलेल्या साहित्याच्या किंमतीवर सूट मिळवू शकतात. प्रत्येक पॉईट्सची किंमत 1 रुपये इतकी असून वस्तूनिहाय पॉईट्सचा तक्ता रिसायकल बाजारच्या दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात आलेला आहे.
नवी मुंबई शहर स्वच्छतेत नागरिकांप्रमाणेच येथील डि मार्ट, अपना बाजार अशा व्यावसायिक आस्थापना देखील स्वच्छतेविषयी आपली बांधिलकी जपत रिसायकल मार्ट, रिसायकल बाजार अशा संकल्पनांतून स्वच्छ सर्वेक्षणाला हातभार लावत असून सामाजिक दायित्व जपत असल्याबद्दल आयुक्त राजेश नार्वेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.
अपना बाजारच्या नवीन सेक्टर 50 सीवूड नेरुळ येथील शाखेप्रमाणेच अपना बाजारच्या सेक्टर 6 सारसोळे नेरूळ येथील शाखेमध्ये देखील अशाप्रकारचा रिसायकल बाजार सुरु करण्यात येत असून त्याठिकाणीही नागरिक आपल्याकडील टाकाऊ वस्तू देऊन शहर स्वच्छतेत हातभार लावू शकतात तसेच वस्तूंच्या बदल्यात पॉईट्स मिळवून नवीन वस्तू खरेदीवर सूटही मिळवू शकतात.
घनकचरा व्यवस्थापनात ‘थ्री आर’ संकल्पनेअंतर्गत कचरा कमी करणे (Reduce), कच-याचा पुनर्वापर करणे (Reuse) व कच-यावर पुनर्प्रक्रिया करणे (Recycle) अपेक्षित आहे. यामध्ये नागरिक नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात 92 ठिकाणी सुरु केलेल्या ‘मानवतेचे देणे – घेणे’ या थ्री आर सेंटर्समध्ये ‘नको असेल त्या द्या आणि हवे असेल ते घ्या’ या माध्यमातून आपल्या घरातील टाकाऊ वस्तू त्याठिकाणी ठेवून गरजूंपर्यंत पोहचवू शकतात. अथवा डि मार्ट व अपना बाजार येथील रिसायकल मार्ट व बाजारमध्ये त्या वस्तू देऊन पॉईट्सव्दारे खरेदीवर सवलत मिळवू शकतात. या दोन्ही गोष्टी शहर स्वचछतेला हातभार लावणा-या असून नागरिकांनी याचा जास्तीत जास्त उपयोग करावा आणि स्वच्छता कार्यात सामाजिक बांधिलकी जपत आपले अनमोल योगदान द्यावे असे आवाहन नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
‘स्वच्छ भारत मिशन नागरी 2.0’ मधील ‘माझे जीवन, माझे स्वच्छ शहर (Meri Life Mera Swachh Shahar)‘ या अभिनव उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘21 दिवस चॅलेंज’ अंतर्गत ‘आरआरआर सेंटर’ ही अभिनव संकल्पना राबविली जात असून यामध्ये शहरात ठिकठिकाणी 92 थ्री आर सेंटर्स नव्या स्वरुपात कार्यान्वित करण्यात आलेली आहेत.
========================================================
अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL