लॉकडाऊन- कोरोना काळातील समाज जीवनाचे चित्रण करणारी कादंबरी

  • अविरत वाटचाल  न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 15 मे 2023

दर्जेदार साहित्य रसिकांना सातत्याने देण्याची ‘ग्रंथाली’ची एक परंपरा आहे. त्या परंपरेला साजेशी एक डाॅ संभाजी खराट, सेवानिवृत्त उपसंचालक (माहिती)लिखित अतिशय सुबक सुंदर देखणी व अगदी आटोपशीर कादंबरी लाॅकडाॅऊन नुकतीच गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर प्रकाशित झाली आहे. या कादंबरीचे मुखपृष्ठ अगदी सूचक आहे व रेखाटले आहे नामांकित चित्रकार सतीश खानविलकर यांनी. जाळीदार पार्श्वभूमीवर कोरोनामुळे हतबल झालेली मनुष्याकृती! अवघ्या ९४ पृष्ठांमध्ये कोरोनाचा भलामोठा पट उलगडणे तसे अवघडच पण डॉ संभाजी खराट यांनी अगदी लिलया हे आव्हान पेलले आहे. आतापर्यंत त्यांची विविध विषयांवर तसेच साहित्य स्वरुपात अशी २८ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या लेखनात एक नेमकेपणा व आटोपशीरपणा आहे. त्यांची लेखनशैली प्रवाही आहे त्यामुळेच या कादंबरीतील मोठा पट ते अगदी कमी पृष्ठात उलगडू शकले आहेत.

कोरोनाकाळ प्रत्येकानेच अनुभवला आहे. त्याची झळ प्रत्येकालाच बसली आहे. हा काळ कुणालाही विसरणे केवळ अशक्य आहे. अगदी डोळ्यासमोर जवळची माणसं पाहता पाहता कोरोनाने कशी गिळंकृत केली आणि त्या प्रसंगात काहीच करु शकत नसल्याची हतबलता बर्‍याचजणांनी अनुभवली आहे. या कठीण काळातील अनुभवांनी अनेकांना लिहिते केले आहे. संध्या साठे जोशी यांचा लाॅकडाॅऊन कथासंग्रह आलेला आहे. लाॅकडाॅऊन कुलुपबंद मनांच्या कथा शोभा डे यांनी लिहिल्या आहेत. कोरोण्यकांड म्हणून ऋतुजा राजपूत यांची कादंबरी आलेली आहे. डॉ श्रीकांत पाटील यांची लाॅकडाॅऊन कादंबरी आलेली आहे. यात आता डॉ संभाजी खराट यांची लाॅकडाॅऊन ही कादंबरी रसिक आणि चोखंदळ वाचकांच्या भेटीस आलेली आहे आणि ती नक्कीच स्वागतार्ह आहे.

ही कथा केवळ एकाच कुटुंबाची नाही तर ती तुम्हा आम्हा सर्वांचीच किंबहुना समस्त मानव समुदायाची आहे. या कथेचा ‘कोरोना’नामक खलनायक सूक्ष्म आणि अदृश्य आहे. त्याच्या हल्ल्यांनी अवघी मानवजात बेजार आणि हतबल झालेली आहे. कोरोनाला हरवण्याची मानवाची लढाई म्हणजे अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘एका कोळियाने (Old Man and Sea) या कादंबरीची प्रकर्षांने आठवण व्हावी अशी थरारक आहे.

लाॅकडाॅऊन या कादंबरीची सुरुवात अगदी सूचक समर्पक आणि अर्थपूर्ण आहे. शरीरात कोणताही जंतू संसर्ग होण्याचे प्रवेशद्वार म्हणजे नाक!’ नाकाला लावलेला मास्क ज्ञानेशने जोराने काढला अशी या कादंबरीची सुरुवात होते.
बँकेत काम करणारा ज्ञानेश. ३१ मार्चची व्यस्तता आणि त्यात चीनचा कोरोना असा त्याचा त्रागा सुरु असतो. त्याची बायको सविता, वडील शामराव आणि दोन मुले दीपा व विशाल.दीपा ११ वीत तर विशाल फर्स्ट इयरला. वडील सेवानिवृत्त शिक्षक. त्यांच्या भोवती ही कादंबरी फिरते. त्यांच्या शेजारी रहिम चाचा, फरीदा ही त्यांची पत्नी, त्यांना १ मुलगा आणि २ मुली असे कुटुंब. ठाण्यात बसस्टॅण्डजवळ त्यांचे छोटेसे जनरल स्टोअर्स असते. कोरोना काळात ते बंद असल्याने त्यांच्या घरात आर्थिक अडचण असते. ज्ञानेश त्यांना आर्थिक मदत करतो. रहिम शेख यांचा मुलगा नजीर शेख हा तापाने आजारी पडतो तेव्हा ज्ञानेश त्याला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी मदत करतो. दिवे लावा या आवाहनानुसार दिवे का नाही लावले म्हणून काही लोक रहिमचाचांना मारायला येतात. दूर गावी रहिमचाचांची वयोवृद्ध आई आजारी. तिला कोरोनाकाळात भेटणे अगदी दुरापास्त झालेले पण त्यासाठीही ज्ञानेश मदत करतो असा कथाभाग या कादंबरीत आलेला आहे.

असे जरी असले तरी या कादंबरीचे खरे नायक अनेक आहेत. कोरोनाशी लढा देणारे अनेक सामान्य नागरिक, देवदूत म्हणून स्वत:चा जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा देणारे अनेक डॉक्टर्स, रुग्णांची शुश्रूषा करणार्‍या नर्सेस, सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प असतांना अहोरात्र सेवा देणारे बेस्ट बसेसचे वाहक चालक, आईने जसे आपल्या बाळाला कवेत घ्यावे त्या ममतेने प्रवाशांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असलेल्या रेल्वेने रेल्वे बंद असली तरी जागोजागी आयसोलेशन वार्ड उघडून प्रवाशांच्या सेवेसाठी धावून आली, रोज २ – ३ लाख लोकांचे जेवण रेल्वेने बनवले, अन्नधान्य, औषधे, भाजीपाला यांचे वाहतूक करणारे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे घर दार विसरुन उन्हातान्हात ना सावली ना विश्रांती अशा स्थितीतही कर्तव्य बजावणारे पोलीस, सफाई कामगार, अन्नदान- पाणी- वाहतूक नियंत्रण-रक्तदान शिबिर यात कार्यरत स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते हे कोरोना लढ्यातील योध्दे या कादंबरीचे नायक आहेत.
कोरोनाची सुरुवात, रुग्णसंख्येत वाढ, रुग्ण दगावणे, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी, प्रसार थांबावा म्हणून उपाययोजना, कडक संचारबंदी, लस शोधण्यासाठी संशोधकांचे प्रयोग,कोरोनाकाळात कर्मचारी, सर्वसामान्य जनता, मजूर, परप्रांतीय कामगार यांच्या हालअपेष्टा, संघर्ष यांचे अगदी बारकाईने चित्रण लेखकाने केले आहे. कोरोनाकाळाचे अनेक पैलू, अनेक कंगोरे, अनेक बाजू, फायदे तोटे लेखकाने अगदी बारकाईने उलगडले आहेत. कादंबरी अथ पासून इति पर्यंत अगदी सलग आहे आणि सलग वाचतांना प्रत्येक ठिकाणी लेखकाची सूक्ष्म निरीक्षण शक्ती जाणवते. लेखकाने अगदी सर्व मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे.

मास्कचे विविध प्रकार, लोकांचा निष्काळजीपणा, दुधाच्या टँकरमधून स्थलांतर, क्वारंटाईनचा शिक्का लपवून बाजारात फिरणारे बेजबाबदार लोक, मद्यप्रेमी, पान गुटखा खाणार्‍यांचे हाल व त्यांच्या व्यथा , कोरोनावरील विनोद इ बारीक सारीक तपशील वाचताना वाचकाला प्रत्यक्ष कोरोनाकाळात अनुभवलेले प्रसंग आठवतील व पुनर्प्रत्ययाचा अनुभव येईल.
या कादंबरीच्या निमित्ताने लेखकाने वैद्यकीय क्षेत्रातील संशोधकांच्या कार्याकडे लक्ष वेधले आहे. भविष्यात कोरोनापेक्षा जास्त भयंकर विषाणू येऊ शकेल याकडे लक्ष वेधून वैद्यकीय क्षेत्रातील संशोधक व शास्त्रज्ञ यांना बळ देण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे.
ही कादंबरी म्हणजे कोरोनाकाळ आणि समस्त मानव जमातीची कोरोनाविरुध्द लढ्याची इत्यंभूत कथा आहे. या काळाचे ते ऐतिहासिक दस्तावेज आहे कारण कालांतराने कोरोना या पृथ्वीवरुन पूर्णतः नष्ट होईल तेव्हा या भयंकर विषाणूशी मानवाने कसा लढा दिला हे या कादंबरीच्या माध्यमातूनच पुढील पिढीला कळेल. असे संकट भविष्यात आले तर हतबल न होता, गांगरुन न जाता संकटाशी मुकाबला कसा करावा, दोन हात कसे करावे याचे निश्चित दिग्दर्शन या कादंबरीच्या माध्यमातून होत राहील यात शंका नाही.
– विलास कुडके
लॉकडाऊन (कादंबरी)
लेखक – डॉ.संभाजी खराट
प्रकाशक – ग्रंथाली ,मुंबई

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL