मागील दोन वर्षात 651 अधिकारी, कर्मचा-यांना आश्वसित प्रगती योजनेचा लाभ व 346 कर्मचा-यांना पदोन्नती
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 11 मे 2023
नवी मुंबई महापालिकेच्या सेवेत असणाऱ्या विविध विभागातील 20 अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे 30 कर्मचा-यांना 3 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आलेली आहे.
यामध्ये तीन लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना 30 कर्मचा-यांना लागू करण्यात आलेली असून यामध्ये 8 उपलेखापाल, 2 श्रवण व वाचा तज्ज्ञ, 1 मानसोपचार तज्ज्ञ, 4 हस्तकला शिक्षक, 1 शारीरिक शिक्षक निदेशक, 1 व्यवसायोपचार तज्ज्ञ, 2 चित्रकला शिक्षक, 2 शिपाई, 4 मुकादम, 5 सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे. मे 2021 पासून मागील 2 वर्षांत 621 अधिकारी, कर्मचा-यांना 3 लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आला असून आज 30 अधिकारी, कर्मचारी यांना हा लाभ देण्यात आलेला आहे. अशाप्रकारे मे 2021 पासून 2 वर्षात एकूण 651 कर्मचा-यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे.
सहाव्या वेतन आयोगानुसार 12 व 24 व्या वर्षी मिळणारे आश्वासित प्रगती योजनेचे दोन लाभ आता सातव्या वेतन आयोगानुसार 10 व्या, 20 व्या व 30 व्या वर्षी असे 3 लाभांच्या स्वरूपात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेनुसार मिळत असून या निकषात बसणा-या कर्मचा-यांना ते लवकरात लवकर देण्यात यावेत असे निर्देश आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यामार्फत देण्यात आले आहेत. त्यानुसार पदोन्नती समितीच्या नियमित बैठका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या अध्यक्षतेखाली होत असून तेथील निर्णयांची पुढील कार्यवाही प्रशासन विभागाचे उपआयुक्त नितिन नार्वेकर यांच्यामार्फत तातडीने केली जात आहे. पदोनत्ती समितीच्या कामकाजाचा आढावा आयुक्तांमार्फत नियमितपणे घेतला जात असून पदोन्नती प्रमाणेच 3 लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभही निकषात बसणा-या महापालिका कर्मचा-यांना लागू करण्यात येत आहे.
यासोबतच पदोन्नतीस पात्र 12 प्रशासकिय अधिकारी आणि 8 स्वच्छता निरीक्षक अशा एकूण 20 कर्मचा-यांना पदोन्नती देण्यात आली असून मे 2021 पासून मागील 2 वर्षात एकूण 346 कर्मचा-यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे.
मागील 2 वर्षांच्या कालावधीत आजच्या 30 कर्मचा-यांसह एकूण 651 अधिकारी, कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ तसेच आज 20 कर्मचा-यांसह मागील 2 वर्षात एकूण 346 अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नत्या देण्यात आलेल्या आहेत. महापालिका आयुक्त नार्वेकर यांच्या कर्मचारीहिताय निर्णयामुळे महापालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
========================================================
अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL