वाहनचोरी करणाऱ्या त्रिकुटाची एपीएमसी पोलिसांकडून धरपकड

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 6 मे 2023

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी पार्क केलेल्या  ऑटोरिक्षा तसेच मोटार सायकल चोरणाऱ्या त्रिकुटाला एपीएमसी पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून 8 वाहने जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहने चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी झोन 1 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त टेळे, एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तनवीर शेख तसेच पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोहीम आखण्यात आली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिऊरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेवाळे आणि डी.बी.पथक यांच्या पथकांनी तपास मोहीम सुरू केली. या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे उलवे परिसरात राहणाऱ्या अशरफ फजनुदीन गोरी याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता दोन ऑटो रिक्षा आणि चार मोटार सायकल चोरल्याचे कबूल केले. तसेच त्याच्याकडून मिळालेल्या अधिक माहितीच्या आधारे पोलिसांनी   शाबानअली अनवर अली शहा आणि मुकेशकुमार बनारसी गुप्ना या दोघांना मानखूर्द परिसरातून ताब्यात घेतले. या आरोपींनीदेखील 2 ऑटोरिक्षा चोरल्याचे कबूल केले.

पोलिसांनी या तिन्ही आरोपींकडून 4 ऑटोरिक्षा आणि 4 मोटार सायकल असा एकूण साडे चार लाख रुपये किंमतीची वाहने जप्त केली आहेत. या तपास मोहीमेअंतर्गत एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 5 गुन्हे तसेच वाशी, कोपरखैरणे, तुर्भे पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 1 असे 8 गुन्हे उघडकीस आले आहेत.

दरम्यान, या तपास मोहीमेदरम्यान मोबाइल चोरी करणाऱ्या दिपेश पवार यालाही पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 13 हजार 999 ररुपये किंमतीचे मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत.

ही उल्लेखनीय कामगिरी एपीएमसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर शिऊरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेवाळे, पोलीस हवालदार चंद्रकांत कदम, सुनिल पाटील, अमर बेलदार, प्रभाकर म्हात्रे, संदेश म्हात्रे, पोलीस नाईक प्रदीप हरड, शशिकांत नलावडे, सोमनाथ काळे, आशिष पाटोळे,  अमर भिलारे, संतोष वाटकर यांच्या पथकाने केली आहे. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय मोहीते, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तनवीर शेख आदींनी या पथकाचे कौतुक केले आहे.

=======================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL