माझी वसुंधरा अभियानांतर्गत नमुंमपा मुख्यालयाच्या आवारात देशी प्रजातींचे वृक्षारोपण

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 26 एप्रिल 2023

‘माझी वसुंधऱा’ अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच नैसर्गिक पंचतत्वांच्या रक्षण व संवर्धनासाठी विविध उपक्रम व्यापक लोकसहभाग घेऊन राबविले असून यामुळेच महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत नवी मुंबई हे राज्यातील क्रमांक एक चे पर्यावरणशील शहर म्हणून नावाजले गेले आहे.

सन 2023-24 मधील ‘माझी वसुंधरा’ अभियानाला सामोरे जाताना महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने वैविध्यपूर्ण उपक्रमांचे नियोजन केले असून 22 एप्रिल या जागतिक पृथ्वी दिवसापासून पर्यावरण रक्षण व संवर्धनाचे कार्यक्रम राबविले जात आहेत.

या वर्षीही जागतिक पृथ्वी दिनाची संकल्पना ‘आपल्या पृथ्वीमध्ये गुंतवणूक करा’ यास अनुसरून विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून आज महापालिका मुख्यालयाच्या आयकॉनिक इमारतीसमोरील प्रांगणात अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व प्रशासन आणि उद्यान विभागाचे उपआयुक्त  नितीन नार्वेकर आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते कडुनिंबाची वृक्षरोपे लावण्यात आली.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वृक्षारोपण करताना प्राधान्याने देशी वृक्षांची लागवड करण्यात येत असून ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या नमुंमपा नोड़ल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले यांच्या नियंत्रणाखाली हरित नवी मुंबई हे उद्दिष्ट साकारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये कमी जागेत जास्त संख्येने वृक्ष लागवडीची मियावाकी पध्दत शहरी जंगल निर्मितीसाठी वापरली जात आहे. त्याचप्रमाणे इतरही ठिकाणी जागेच्या उपलब्धतेनुसार वृक्ष लागवड करण्यात येत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या आवारात संपन्न झालेल्या वृक्षारोपणाचे नियोजन उद्यान विभागामार्फत उद्यान अधिक्षक भालचंद्र गवळी व वरिष्ठ उद्यान सहाय्यक विजय कांबळे यांनी सुनियोजित रितीने केले.

=======================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

अविरत वाटचाल वर्तमानपत्र