नवी मुंबई शहर स्वच्छ हवा कृती आराखडयाची प्रभावी अंमलबजावणी करावी – आयुक्त 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २५ एप्रिल २०२३

 केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रमाची नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने नवी मुंबई शहर स्वच्छ हवा कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्या अनुषंगाने कृतीशील पावले उचलण्यात आहेत. त्याकरिता विविध उपक्रम राबविले जात असून पर्यावरणपूरक उपाययोजनांव्दारे हवा गुणवत्तावाढीसाठी प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत आयुक्तांनी याबाबतच्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला व या पुढील काळात करावयाच्या कामांच्या नियोजनाविषयी निर्देश दिले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले, शहर अभियंता  संजय देसाई, प्रशासन व उदयान विभागाचे उपआयुक्त नितीन नार्वेकर, परिमंडळ 1 चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे, परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ अमरिश पटनिगेरे व संबधित विभागप्रमुख, अधिकारी तसेच एन.सी.ए.पी.चे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहर स्वच्छ हवा कृती आराखडयाच्या अनुषंगाने हवेतील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ते नियमीतपणे धुणे, त्यासाठी पुनर्प्रक्रियाकृत पाणी वापरुन पिण्याच्या पाण्याची बचत करणे, मुख्य रहदारीच्या चौकातील कारंजे नियमीत सुरु ठेवणे व त्यातही पुनर्प्रक्रियाकृत पाण्याचा वापर करणे, फ्लेमिंगो पाँईंट्सचे संवर्धन करणे. धुलीकण प्रदूषण करणा-या कॉरी व आरएमसी प्लान्टवर कारवाई करणे अशा विविध प्रकारे वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

या पुढील कालावधीत स्वच्छ हवा कृती आराखड्यांतर्गत धूळ जास्त प्रमाणात धूळ निर्माण होते अशा ठिकाणी वॉटर स्प्रिंकलर सिस्टिमचा वापर करण्यासाठी सकारात्माक पावले उचलण्यात यावीत असे निश्चित करण्यात आले. एमआयडीसी क्षेत्रातील सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी धूळ प्रतिबंधक उपायोजना राबविणेबाबत संबंधितांना एमआयडीसी मार्फत सूचना देण्यात याव्यात असे निश्चित करण्यात आले. नवी मुंबई विमानतळाचे काम गतीमानतेने सुरु असुन त्याठिकाणी मोठया प्रमाणात निर्माण होणा-या धूळीचा प्रतिकुल परिणाम व अतिरिक्त ताण शहरातील हवेवर पडत असून याबाबत सिडको प्रशासनाशी उच्च पातळीवर चर्चा करण्यात यावी व हवा प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक  त्या उपाययोजना प्रभावी रितीने व्यापक स्वरुपात राबविण्याचे काम त्यांच्याकडून करवून घ्यावे असे ठरविण्यात आले. महापालिका क्षेत्रात सुरु असलेल्या इमारती व इतर बांधकामाच्या ठिकाणीही प्रदूषण प्रतिबंधक उपाययोजना काटेकोरपणे राबविण्यात याव्यात याकडे विभाग कार्यालय स्तरावरुन बारकाईने  लक्ष दिले जावे असे निर्देश आयुक्तांनी दिले.

=======================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

अविरत वाटचाल वर्तमानपत्र