सफाईमित्रांना कामातील अद्ययावत ज्ञान देण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेत विशेष कार्यशाळा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 20 मार्च 2023

 स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई आघाडीवर असणारे शहर असून यामध्ये मलनि:स्सारण वाहिन्यांची सफाई  करणा-या सफाईमित्रांचेही फार मोठे योगदान आहे. सफाईमित्रांना आपल्या कामाचे अद्ययावत ज्ञान असावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाच्या वतीने सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज अंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

 नमुंमपा मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित कार्यशाळेचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त्‍ श्रीम. सुजाता ढोले यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या प्रसंगी शहर अभियंता श्री. संजय देसाई, स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाचे उपआयुक्त तथा स्व्च्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेंब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता श्री. मनोज पाटील व श्री. शिरीष आरदवाड तसेच प्रशिक्षण देणा-या कॅम्प फाऊंडेशन पुणे या संस्थेच्या प्रतिनिधी डॉ. स्मिता सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.

 याप्रसंगी बोलताना शहर अभियंता संजय देसाई यांनी आपण करीत असलेल्या कामामध्ये परिपूर्ण होण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेणे आवश्यक असून त्यासोबतच आपल्या आरोग्याची व सुरक्षेची काळजी घेणेही स्वत:च्या व आपल्या कुटूबियांच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट असल्याचे सांगत त्यादृष्टीने या विशेष कार्यशाळेतील प्रशिक्षणाचा काळजीपूर्वक लाभ घ्यावा असे आवाहन केले.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी आता मॅनहोलपासून सुटका होऊन मशीनहोलचा वापर सुरु झाला असून केंद्र सरकारने 2021 मध्ये सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज जाहीर करण्याच्या कितीतरी वर्ष आधीपासून म्हणजे सन 2008 पासून नवी मुंबई महानगरपालिकेने यांत्रिकी साफसफाईला प्रारंभ केला असल्याचे सांगितले. मॅनहोल टाळून मशीनहोलव्दारे स्वच्छतेमुळे कामात अधिक गतीमानता व सुरक्षितता आली असल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रशिक्षण आपल्या माहिती व ज्ञानात अधिक भर घालणारे असून त्याचा जास्तीत जास्त्‍ उपयोग करुन घ्यावा असेही ते म्हणाले.

या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत पहिल्या दिवशी परिमंडळ -1 क्षेत्रातील सफाईमित्र व दुस-या दिवशी परिमंडळ -2 क्षेत्रातील सफाईमित्र प्रशिक्षणाचा लाभ घेणार असून पुण्यातील कॅम्प फाउंडेशनच्या प्रतिनिधी डॉ. स्मिता सिंह या प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदशन करीत आहेत. यामध्ये सफाईमित्रांसाठी सुरक्षा साधने व साधन सामुग्री वापरणे, सक्शन जेटींग तसेच इतर मलनि:स्सारण साफसफाई विषयक वाहने व सुरक्षा साधने याची माहिती प्रात्यक्षिकासह दिली जाणार आहे. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद सादला जाणार असून या कामाबाबत त्यांचेही मत जाणून घेतले जात आहे.  दिनांक 21 मार्च रोजी परिमंडळ 2 विभागातील सफाईमित्रांचे प्रशिक्षण घेतले जाणार आहे.

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

अविरत वाटचाल वर्तमानपत्र