- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 17 मार्च 2023
कोव्हीड लसीकरण असो की इतर कोणतीही लसीकरण मोहीम असो, नवी मुंबई महानगरपालिका लसीकरण मोहीम राबविण्यामध्ये नेहमीच राज्यात अव्वल राहिली असून यामध्ये घराघरापर्यंत आरोग्य विषयक जनजागृती करणा-या व माहिती पोहचविणा-या आशा स्वयंसेविकांचा सर्वात मोठा वाटा असल्याचे सांगत नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी राष्ट्रीय लसीकरण दिवस हा आशा स्वयंसेविकांसाठी समर्पित दिवस म्हणून ‘आशा दिवस’ साजरा करण्याचे ठरविले असल्याचे सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने 16 मार्च या राष्ट्रीय लसीकरण दिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या आशा दिवस या वारकरी भवन सीबीडी बेलापूर येथे आयोजित विशेष कार्यक्रमाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. वर्षा राठोड व डॉ. उध्दव खिल्लारे, लसीकरण नोडल अधिकारी तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण व डॉ. राजेश म्हात्रे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
शासनामार्फत कुटुंब नियोजन, एएनसी केअर, पीएनसी केअर, चाईल्ड इम्युनिझेशन या निर्देशांकातील कामानुसार गुण प्रदान करून त्यांची श्रेणी काढण्यात येते. यामध्ये 75 पैकी 71.6 गुण प्राप्त कऱणा-या नागरी आरोग्य केंद्र, नोसिल नाका याच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना बनसोडे यांना प्रथम, 71.0 गुण प्राप्त कऱणारे नागरी आरोग्य केंद्र, चिंचपाडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा सारुक्ते यांना व्दितीय आणि 70.4 गुण मिळविणा-या नागरी आरोग्य केंद्र, इलठणपाडा यांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वसावे यांना तृतीय क्रमांक मिळविला.
याशिवाय ज्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील ए.एन.एम. यांनी जास्तीत जास्त कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेकरिता महिला लाभार्थ्यांना संदर्भित केले आहे त्यामध्ये घणसोली केंद्रातील पुनम वाकोडे (45 महिला लाभार्थी), दिघा केंद्रातील पौर्णिमा परांजपे (37 महिला लाभार्थी) आणि हंसा चौधरी (37 महिला लाभार्थी) यांना अनुक्रमे प्रथम व व्दितीय (विभागून) क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कुटुंब नियोजन पुरुष शस्त्रक्रियेसाठी प्रवृत्त करणा-या ए.एन.एम. यांनाही सन्मानीत करण्यात आले. यामध्ये ज्योती पिंगळे (सानपाडा), विद्या दावंडे (करावे), मोहिनी निकम (नेरुळ फेज 1), योगीता राऊत (राबाडा), कविता ताजवे (सानपाडा), स्वाती गायकवाड (सीबीडी बेलापूर), प्राजक्ता मोरे (कातकरीपाडा), संध्या साळुंखे (नोसील नाका), ज्योती कायंदे (सीबीडी बेलापूर) या ए.एन.एम. यांचा उत्तम कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला.
नागरी आरोग्य केंद्र स्तरावर विविध कार्यक्रम राबविताना आर.सी.एच. कार्यक्रमामध्ये रुग्णालयांचा महत्वाचा वाटा आहे. यामध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात, पीपीआययुसीडी, प्रसूती अशा विविध बाबींविषयीच्या निर्देशांकांनुसार एकूण प्रसूतींपैकी सर्वात जास्त 3260 प्रसूती झालेले रुग्णालय म्हणून माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय यांना सन्मानीत करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. उध्दव खिल्लारे यांना सन्मानीत करण्यात आले.
त्याचप्रमाणे रुग्णालयाचा दुसरा निर्देशांक सर्वात कमी उपजत मृत्यू आणि बालमृत्यू असणारे रुग्णालय म्हणून राजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोली यांना सन्मानीत करण्यात आले. वैद्यकीय अधिक्षक डॉ. वर्षा राठोड यांनी हा सन्मान स्विकारला. या रुग्णालयाची वाटचाल राष्ट्रीय स्तरावरील लक्ष्य मानांकनाकरिता सुरु आहे.
सर्वात जास्त कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणारे रुग्णालय म्हणून सार्वजनिक रुग्णालय, वाशी यांना सन्मानीत करण्यात आले. वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत जवादे यांच्या नेतृत्वाखाली हा सन्मान स्विकारण्यात आला. एप्रिल 2022 ते फेब्रुवारी 023 या कालावधीत आयएचआयपी पोर्टलनुसार 893 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वाशी रुग्णालयात कऱण्यात आल्या आहेत.
लसीकरणाच्या पर्यवेक्षणासोबतच तांत्रिक मार्गदर्शन, लस हाताळण्याकरिता मार्गदर्शन करणा-या सार्वजनिक आऱोग्य परिचारिका पल्लवी जोशी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी आशा स्वयंसेविका व आरोग्य विभागातील महिला कर्मचा-यांनी गायन, नृत्य आदी कलाप्रकारांचे उत्साहाने सादरीकरण करून राष्ट्रीय लसीकरण दिवस जल्लोषात साजरा केला. दैनंदिन धावपळीच्या व धकाधकीच्या कामकाजातून आशा स्वयंसेविकांना एकत्र येऊन राष्ट्रीय लसीकरण दिवसाचे औचित्य साधत आनंदाने ‘आशा दिवस’ साजरा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित आशा स्वयंसेविका व महिला कर्मचा-यांनी आयुक्त राजेश नार्वेकर व अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या निर्णयाचे मनापासून स्वागत केले व समाधान व्यक्त केले.
========================================================
- अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL
========================================================
अविरत वाटचाल वर्तमानपत्र