ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे हृदयविकाराने निधन

मुंबई, 6 जानेवारी 17 :

आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत दबदबा निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे शुक्रवारी हृदयविकाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

ओम पुरी यांचा जन्म हरियाणामधील अंबाला येथे 18 ऑक्टोबर 1950 रोजी झाला होता.  1973 मध्ये त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातून अभिनयाचे धडे घेतले होते. दणकट अभिनय, भारदस्त आवाज आणि अप्रतिम संवादफेकीसाठी ते ओळखले जात. रंगभूमी  असो कि समांतर सिनेमा, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी छाप सोडली होती. चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते.

1976 मध्ये घाशीराम कोतवाल चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण करणाऱ्या ओम पुरी यांना आक्रोश या चित्रपटाने त्यांना रातोरात स्टार केले. केवळ हिंदीतच नव्हे तर अनेक हॉलिवूड पटांमध्येही त्यांनी महत्वपूर्ण भूमिका केल्या. सतत काम करण्याची त्यांची सवय होती. शेवटच्या क्षणापर्यंत ते काम करीत होते. त्यांच्या जाण्याने एक गुणी अभिनेता गमावल्याची भावना चित्रपटसृष्टीत व्यक्त होत आहे.

ओम पुरी यांचे काही गाजलेले चित्रपट

घाशीराम कोतवाल, आक्रोश, अर्धसत्य, धारावी, गुप्त, युवा, जाने भी दो यारो, मिर्चमसाला, घायल, नरसिंह, माचिस, चाची 420, हेराफेरी, खडकसिंग, दबंग, बजरंगी भाईजान.