दिवाळे गावात रंगली लंगोटी क्रिकेट स्पर्धा

  • हेमंत कोळी- गोवेकर /अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 6 मार्च 2023

काळाच्या ओघात सर्वच सणांचे रूप पालटत असले तरी ‘स्मार्ट सिटी’तील गावांमध्ये सण, उत्सवाची परंपरा आणि गावच्या मैदानी खेळाची परंपरा आज हि जोपासली आहे. सर्वत्र होळीचा सण साजरा होत असताना नवी मुंबईतील दिवाळे कोळीवाड्यात एका आगळ्या वेगळ्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत दिवाळे गावातील ११ संघानी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेदरम्यान, सर्व खेळाडूंनी डोक्यावर लाल टोपी आणि कमरेवर सुरका ( लंगोटी ) अशा पारंपरिक कोळी वेशभूषा परिधान करून खेळल्याने या क्रिकेट स्पर्धेला खऱ्या अर्थाने रंगत चढली होती. दरम्यान, आगरी कोळी समाज हा जितका उत्सवप्रिय आहे तितकाच तो आपल्या प्रत्येक कलागुणांना वाव देणारा आहे. त्यामुळे या समाजाने आजही आपले वेगळेपण जपले आहे विशेष म्हणजे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात लंगोटी घालून खेळली जाणारी हि एकमेव स्पर्धा असून हे क्रिकेट सामने पाहण्यासाठी पंचक्रोशीतील प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

यावेळी, चुरशीच्या११ संघांच्या प्रवासानंतर अखेरच्या अटीतटीच्या सामन्यात अखेर सिद्धिविनायक बिट्स क्रिकेट संघाने बाजी मारली तर मंगलमूर्ती इलेव्हन या संघाने द्वितीय पारितोषिकाचा मान पटकावला. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – मंथन पाटील, उत्कृष्ट गोलंदाज – विशाल कोळी, उत्कृष्ट फलंदाज – वैभव कोळी तर, सामनावीर विकी मुंबईकर यांना सन्मानित करण्यात आले, अशा स्पर्धेच्या माध्येमातून नव तरुणांना नवचैतन्य मिळेल व आंतराष्ट्रीय पातळीवर खेळता यावे यासाठी मैदानी स्पर्धाची अखंडित परंपरा आपण कायम ठेवली पाहिजे , असे मत भव्य होळी चषक स्पर्धेचे आयोजक संजय कोळी यांनी व्यक्त केले.

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

=======================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र