- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 6 मार्च 2023
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने (उमेद) नवीमुंबईत पहिल्यांदा वाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटर या ठिकाणी दि. 8 ते 19 मार्च 2023 या कालावधीत राज्यस्तरीय “महालक्ष्मी सरस प्रदर्शन-2023” चे भव्यदिव्य आयोजन करण्यात येत असल्याची माहिती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी आज सिडको भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून संघटित करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण क्रयशक्तीला बाजारपेठ मिळवून व्यवसायवृध्दी व्हावी असा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.
दरवर्षी मुंबईतील बांद्रा या ठिकाणी भरविण्यात येणारे महालक्ष्मी सरस प्रदर्शन यंदा नवीमुंबईत भरविण्यात येत असल्याने नवी मुंबईकरांना या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च 2023 रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
महालक्ष्मी सरस प्रदर्शन एक अत्यंत नावीन्यपूर्ण आणि ग्रामीण संस्कृतीला शहरापर्यंत पोहोचविण्याचे अनोखे व्यासपीठ आहे. या राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये साधारण ५११ स्टॉल असणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ३५० आणि देशभरातून साधारण ११९ स्टॉल येणार आहेत तसेच नाबार्डचे ५० स्टॉल यात आहेत. प्रदर्शनात राज्याच्या कानाकोपन्यातून आलेल्या सुगरणींचे खमंग आणि रुचकर शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचे ७० स्टॉलचे मिळून भव्य असे फूड कोर्ट असणार आहे. या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसर, हातमागावर तयार केलेले कपड़े, वुडन क्राफ्ट, बंजारा आर्ट,वारली आर्ट च्या वस्तू असणार आहेत. याशिवाय महिलांच्या आकर्षणाच्या अनेक प्रकारच्या ज्वेलरी,लाकडी खेळणी, इतर राज्यातील दुर्मिळ वस्तूंची रेलचेल या प्रदर्शनात असणार आहे. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पनवेल शहरातील नागरिकांना प्रदर्शनाचा आरामदायी अनुभव घेता यावा याकरिता संपूर्ण प्रदर्शन वातानुकूलित असणार आहे. त्याचप्रमाणे सहकुटुंब भेट देणाऱ्या कुटुंबांचा विचार करून लहान मुलांना खेळवाडी ( प्ले एरिया) उभारण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय मीलेट (भरडधान्य) वर्ष लक्षात घेऊन स्वतंत्र मिलेट दालन यात असणार आहे. खात्रीचे आणि प्रमाणित असे सेंद्रिय पदार्थ शहरवासीयांना या प्रदर्शनात उपलब्ध होणार आहेत.
राज्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी उमेद अभियान नेहमीच कार्यरत असते. महिलांना स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून संघटित करणे. तसेच ग्रामीण भागातील महिलांना अनेक प्रकारचे क्षमता विकास आणि कौशल्यवृध्दीसाठी प्रशिक्षण देणे. उमेद अभियानातून प्रशिक्षीत महिला स्वयंसिद्ध व्हायला तयार आहेत. अनेक प्रकारचे व्यवसाय त्या करू लागल्या आहेत. या महिला स्वयंपाकघरातील गरजेच्या पदार्थांपासून ते LED लाईट निर्मितीपर्यंत अनेक प्रकारची उत्पादने आता बाजारात आणत आहेत. महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला स्वयं सहाय्यता गटांना त्यांच्या वस्तू, उत्पादने, सहजपणे शहरी नागरिकांपर्यत पोहोचविता येतात. त्यांना हक्काची शहरी बाजारपेठ अनुभवण्याची चांगली संधी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. ग्राम विकास विभागाचे मंत्री गिरीश महाजन, ग्राम विकास विभागाचे अपर मुख्य सचिव, राजेश कुमार यांचे या प्रदर्शनाला नियमित स्वरुपात मार्गदर्शन लाभत आहे. या प्रदर्शनातून मोठ्या प्रमाणात विक्री होऊन ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला हातभार लागावा यासाठी प्रदर्शनाला भेट देऊन शुद्ध खात्रीच्या वस्तू आणि पदार्थाची खरेदी करावी, नवीमुंबईकरांनी या प्रदर्शनाचा भरभरुन लाभ घ्यावा, असे आवाहन उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी केले आहे.
========================================================
अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL
========================================================
- अविरत वाटचाल वर्तमानपत्र