पहिले दलित स्री आत्मचरित्र लिहिणाऱ्या शांताबाई कांबळे यांचे निधन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 25  जानेवारी 2023

मराठी साहित्यात पहिले दलित स्त्री आत्मचरित्र लिहिणाऱ्या आणि दलित साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचे आज सकाळी सातच्या सुमारास पुण्यात  वार्धक्यानं निधन झालं. त्या शंभर वर्षांच्या होत्या. दलित पॅंथरचे दिवंगत संस्थापक प्रा. अरुण कांबळे यांच्या त्या मातोश्री होत्या. कोपरखैरणे इथं राहणारे त्यांचे पुत्र चंद्रकांत कांबळे यांच्या ऋतांबरा या निवासस्थानी त्यांचे पार्थिव आणण्यात आले तसेच कोपरखैरणे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचं माज्या जल्माची चित्तरकथा हे आत्मचरित्र विशेष गाजलं. पहिल्यांदा मार्च १९८३ साली ते पूर्वा मासिकात आलं, आणि १७ जून १९८६ रोजी पुस्तक रूपात आलं. ‘नाजुका’ ह्या नावानं मुंबई दूरदर्शनवर चित्रमालिकेच्या स्वरूपात १० ऑगस्ट १९९० पासून हे आत्मकथन सादर झाले. फ्रेंच, इंग्रजी, हिंदी भाषेत या पुस्तकाचे अनुवाद प्रसिद्ध झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे यांचा सहवास त्यांना लाभला.

मातोश्री शांताबाई कांबळे यांच्या निधनानं आंबेडकरी चळवळीची हानी झाली आहे अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. शांताबाई कृष्णाजी कांबळे यांच्या निधनानं एका कालखंडाचा दुवा निखळला आहे, अशा शब्दात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र