नवी मुंबई सजली भित्तीचित्रांनी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 14 जानेवारी 2023

स्वच्छ व सुंदर नवी मुंबई ही नवी मुंबईची ओळख नव्या स्वरुपातील आकर्षक भित्तीचित्रांव्दारे तसेच सुशोभिकरणाव्दारे नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून अधिक लक्षवेधी केली जात आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये देशातील प्रथम क्रमांकाच्या शहराच्या उद्दिष्टपूर्तीसाठीही शहर सुशोभिकरण हा एक महत्वाचा घटक ठरणार असल्याचा विश्वास मुंबई महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

जेजे स्कुल ऑफ आर्ट्स, रचना संसद कला महाविद्यालय, रहेजा स्कुल ऑफ आर्टस अशा नामांकित कला महाविद्यालयांचे विद्यार्थी नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन नवी मुंबईचे चित्र बदलण्यासाठी ब्रश हातात घेऊन कामाला लागले असून त्यांच्यासोबत नवी मुंबईतील उत्तम व्यावसायिक चित्रकारही आपले कलात्मक रंग भरत आहेत. साधारणत: 650 हून अधिक विद्यार्थी व कलावंत चित्रकार नवी मुंबईत ठिकठिकाणी आपले चित्रकलाप्रदर्शन घड़वित असून त्यामध्ये 150 हून अधिक विद्यार्थिनी, महिला चित्रकारांचा समावेश आहे.

ही नवीन चित्रे काढताना त्यामध्ये कला, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता अशा विविध बाबींविषयी कोणताही संदेश न लिहिता चित्रांच्या माध्यमातून जनजागृतीपर संदेश प्रसारण होईल अशाप्रकारे कल्पक संकल्पना चितारल्या जात आहेत, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

यावर्षी काही चित्रभिंती विविध संतांच्या समाजजागृती करणा-या ओव्या, अभंग व वचनांनी सजणार असून त्यासोबतच नामवंत साहित्यिकांच्या जीवनाला प्रेरणा देणा-या काव्यपंक्तीही काही ठिकाणी अनुरुप चित्रांसह सुलेखनांकित करण्यात येणार आहेत.

यावर्षी “स्वच्छ सर्वेक्षण 2023” ला सामोरे जात असताना “निश्चय केला – नंबर पहिला” हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून शहर स्वच्छतेप्रमाणेच सुशोभिकरणाच्या अधिक वेगळ्या संकल्पना राबविण्यावर भर दिला जात असल्याचे नवी मुंबईतील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या कामांमधून दिसून येत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

========================================================

  • अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

=======================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र