नवी मुंबई , 5 जानेवारी 17/AV News Bureau :
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेरूळ, सेक्टर 48 येथे बांधण्यात आलेल्या नागरी आरोग्य केंद्राच्या इमारतीचे आज महापौर सुधाकर सोनवणे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिका ही दर्जात्मक नागरी सुविधा पुरविण्याकडे विशेष लक्ष देत आहे. नागरिकांनीही उपलब्ध सुविधांचा चांगल्या रितीने वापर करावा. शहरात विविध कामानिमित्त रोज बाहेरून नागरिक येत असतात. नवी मुंबई हागणदारीमुक्त करताना ही तरंगती लोकसंख्या लक्षात घेऊन अशा नागरिकांना शहरात स्वच्छतागृहे कुठे आहेत याची माहिती स्थानिक नागरिकांनी द्यावी. जेणेकरून शहर स्वच्छतेच्या कामात आपला हातभार लागेल, असे सोनवणे यांनी यावेळी सांगितले.
शहरातील नागरिकांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काही वैद्यकीय तपासण्यांची सेवा उपलब्ध करून देता येणे शक्य आहे काय? याची पडताळणी आरोग्य विभागामार्फत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
नागरी आरोग्य केंद्र आणि सुविधा
- नागरी आरोग्य केंद्राच्या बांधकामाचे क्षेत्रफळ 4,368 चौ.फूट इतके आहे.
- दोन मजली इमारतीत तळ मजल्यावर आरोग्य तपासणी व औषध कक्ष आहे.
- पहिल्या मजल्यावर ए.एन.एम. रुम, एम.पी.डब्लू रुम, एल.एच. व्ही. रुम उपलब्ध आहेत.
- दुस-या मजल्यावर सभागृह सुविधा आहे.
यावेळी बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदा म्हात्रे, आरोग्य समिती सभापती सलुजा सुतार, उप सभापती उषा भोईर, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती लिलाधर नाईक, समाज कल्याण व झोपडपट्टी सुधार समितीचे सभापती रमेश डोळे, स्थानिक नगरसेवक विशाल डोळस, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रमेश निकम, कार्यकारी अभियंता अजय संख्ये, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक जाधव, बेलापूर विभाग अधिकारी सुभाष अडागळे आणि आन्य मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.