पुण्यात आढळला झिका विषाणूचा रूग्ण

 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 2 डिसेंबर 2022:

पुणे शहरातील बावधन परिसरात एका 67 वर्षिय इसमाला झिका विषाणूची (zika virus) लागण झाल्याचे उघड झाले आहे. सध्या हा रूग्ण पूर्णपणे बरा असून त्याला कोणतीही लक्षणे नाहीत. 30 नोव्हेंबरला एनआयव्ही पुणे यांच्या तपासणीत हा रूग्ण झिका बाधित असल्याचे समोर आले.

मूळचा नाशिकचा असलेला हा रूग्ण 6  नोव्हेंबर रोजी पुण्यात आला होता. त्यापूर्वी ऑक्टोबर 22 मध्ये तो सूरत येथे गेला होता. 16 नोव्हेंबर रोजी हा रूग्ण जहागींर रूग्णालयात ताप, खोकला, सांधेदुखी, थकवा या कारणांसाठी बाह्यरूग्ण विभागाता आला होता. त्यानंतर खाजगी प्रयोगशाळेत हा रूग्ण 18 नोव्हेंबर रोजी झिका बाधित असल्याचे सिध्द झाले. पुणे महानगरपालिकेच्या वतीने या भागात रोग नियंत्रण कार्यवाही करण्यात आली. रूग्णाच्या परिसरातील घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आणि त्यात एकही संशयित रूग्ण आढळून आला नाही. या भागात डासोत्पत्तीसाठी घरोघर सर्वेक्षण, कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. त्यात या भागात झिका विषाणूसाठी कारणीभूत असणा-या एडीस डास उत्पत्ती आढळून आली नाही. सध्या बावधन परिसरात ताप सर्वेक्षण आणि कीटकशास्त्रीय सर्वेक्षण अधिक गतीमान करण्यात आले आहे.

हा संसर्गजन्य आजार नाही. एडिस जातीच्या डासांमुळे हा आजार होतो.  घराभोवती डास जमणार नाहीत याची काळजी घेवून घराचा परिसर स्वच्छ आणि कोरडे ठेवणे आवश्यक आहे.

———————————————————————-