नवी मुंबईत 4 क्षेत्र गोवर प्रभावित क्षेत्र म्हणून घोषित

गोवरचा प्रभाव रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे आयुक्तांचे निर्देश

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 1 डिसेंबर 2022:

नवी मुंबईमध्ये सुरूवातीपासूनच सातत्याने लसीकरण सुरू ठेवल्याने गोवर बाधितांचे प्रमाण काहीसे मर्यादित असल्याचे दिसून येते. महानगरपालिका क्षेत्रात 11 ठिकाणी गोवरचा प्रभाव दिसून आला असून त्यामधील 3 क्षेत्रातील प्रभाव खंडीत करण्यात आला आहे. उर्वरित 8 क्षेत्रांपैकी जुहूगाव, सीबीडी बेलापूर, करावे, पावणे या नागरी आरोग्य केंद्र परिसरातील 4 क्षेत्रे गोवर प्रभावित क्षेत्रे (measles affected areas ) म्हणून घोषित करण्यात येऊन त्याठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

विविध शहरांमध्ये गोवरचा प्रभाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नमुंमपा नियमित लसीकरण टास्क फोर्सची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गोवर स्थितीची सविस्तर माहिती घेतली व नवी मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी अधिक गतीमानतेने कृतीशील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष समन्वयक डॉ. अरुण काटकर, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, बालरोग तज्ज्ञ संघटनांचे पदाधिकारी व महापालिका रुग्णालयांचे वैदयकिय अधिक्षक आणि वैदयकिय अधिकारी उपस्थित होते.

बैठकीमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष समन्वयक डॉ अरुण काटकर यांनी गोवर रुबेला दुरीकरण करण्याकरीता गोवर आजार, शाळांमार्फत करावयाच्या उपाययोजना, केंद्रिय समितीची भेट अणि शिफारशी याबाबत सादरीकरणाव्दारे माहिती दिली. वैदयकिय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी नमुंमपा क्षेत्रातील गोवर रुबेला आजाराबाबची स्थिती व उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली.

लसीकरण हा गोवर नियंत्रणासाठी प्रभावी उपाय असून त्यादृष्टीने अधिक व्यापक स्वरुपात लसीकरणावर भर दयावा व गोवरचे रुग्ण आढळत आहेत अशा गोवर प्रभावित क्षेत्रात (measles affected areas ) अधिक लक्ष केंद्रित करावे असे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आरोग्य विभागाला दिले.

 

गोवर प्रभावित परिसरात एमआर लसीचा 1 अतिरिक्त डोस देणार

महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या आदेशानुसार गोवरचा नवीन रुग्ण आढळल्यास त्या भागात 9 महिने ते 5 वर्ष वयाच्या बालकांना मिझेल रुबेलो लसीचा 1 अतिरिक्त डोस देण्याचे सूचित करण्यात आले असून त्यानुसार जुहूगाव, सीबीडी बेलापूर, करावे, पावणे या चार नागरी आरोग्य केंद्रांच्या गोवर प्रभावित परिसरात एमआर लसीचा 1 अतिरिक्त डोस देण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचप्रमाणे जुहूगाव, सीबीडी बेलापूर, करावे या 3 क्षेत्रातील 6 महिने ते 9 महिने वयाच्या बालकास एमआर लसीचा झिरो डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढील काळात अशा प्रकारची गोवर प्रभावित क्षेत्रे आढळून आल्यास त्या ठिकाणीही याच निकषानुसार कारवाई करण्यास मान्यता देण्यात आली.

अतिरिक्त लसीकरण सत्रांचे नियोजन

नागरी आरोग्य केंद्र, जुहूगाव, सीबीडी बेलापूर, करावे, पावणे यांच्यामार्फत आपापल्या गोवर प्रभावी परिसरात (measles affected areas )अतिरिक्त डोस देण्याबाबतची तयारी पूर्ण झाली असून 6 महिने ते 9 महिने वर्षाआतील 845 बालके व 9 महिने ते 5 वर्ष वयाची 13098 बालके असे एकूण 13943 बालकांचे उदिष्ट नजरेसमोर ठेवून 1 डिसेंबर रोजी 24, 2 डिसेंबर रोजी 29 व 3 डिसेंबर रोजी 30 अशाप्रकारे आगामी 3 दिवसात 83 अतिरिक्त लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे.  

गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळयांची जळजळ, चेह-यावर व शरीरावर लाल सपाट पुरळ ही गोवरची लक्षणे आहेत. रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर 10 ते 12 दिवसानंतर गोवरची लक्षणे दिसून येत असून लसीकरणामुळे टाळता येणारा हा आजार आहे.

या रोगाची लक्षणे आढळल्यास घाबरुन न जाता महानगरपालिकेच्या नजिकच्या नागरी प्राथमिक केंद्राला अथवा महापालिका रुग्णालयाला भेट दयावी. त्याचप्रमाणे गोवरचा उद्रेक प्रतिबंधासाठी आपल्या घरांना भेटी देणा-या महापालिका आरोग्य विभागाच्या स्वयंसेवकांना सत्य माहिती दयावी व संपूर्ण सहकार्य करावे

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर

———————————