महानगर क्षेत्रात 227 ठिकाणी आपला दवाखाना सुरू होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 29 नोव्हेंबर 2022:

मुंबईप्रमाणेच महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पुढच्या टप्प्यात सुरू होणार  आहे. मुंबईत २२७ ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असून त्या माध्यमातून सामान्यांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

‘मुंबई फर्स्ट’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत मुंबई सुशोभीकरण, आरोग्य व्यवस्था, पायाभूत सुविधांचे प्रकल्प आदींबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी संस्थेचे नरींदर नायर, संजय उबाळे, अशांक देसाई, नेवील मेहता, अश्व‍िनी ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, मुंबई हे जगातील सर्वांत सुंदर शहर करण्याचा आमचा मानस असून त्यादृष्टीने कामाला सुरूवात केली आहे. मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाणार असून त्यामुळे खड्डेविरहीत रस्ते ही संकल्पना साकारली जाणार आहे. मुंबईतील वर्दळीच्या ठिकाणी चौक, रस्ते, पदपथ, उड्डाणपूल यांच्या सुशोभीकरणाला सुरूवात झाली आहे.

कोळीवाड्यांचे सुशोभीकरण केले जात असून त्यांच्या स्वच्छतेवर भर दिला जात आहे. पर्यटनाच्यादृष्टीने कोळीवाड्यांचा विकास केला जात असून  तेथील खाद्यसंकृतीची ओळख पर्यटकांना होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

——————————————–