- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 23 नोव्हेंबर 2022:
सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण योजना ऑगस्ट – 2022 करीता संगणकीय सोडत आज बेलापूर इथल्या सिडको भवनमध्ये पार पडली. 31 ऑगस्ट 2022 रोजी सुरू करण्यात आलेल्या गृहनिर्माण योजनेत नवी मुंबईच्या द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर या विविध नोडमधील 4 हजार 158 घरांची सोडत काढण्यात आली. या 4 हजार 158 घरांपैकी 404 घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि उर्वरित 3 हजार 754 घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध करून देण्यात आली होती.
या संगणकीय सोडत प्रक्रियेवर देखरेख करण्याकरिता सिडकोतर्फे सुरेश कुमार, माजी लोकायुक्त यांच्या पर्यवेक्षणाखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. मोईझ हुसेन हेही या समितीतील एक सदस्य होते. सोडतीमध्ये घर लाभलेल्या अर्जदारांनी सिडकोमुळे नवी मुंबईसारख्या सोयी सुविधांनी परिपूर्ण शहरात आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना यावेळी बोलून दाखवली.
सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील 4,158 घरे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आली होती. परवडणाऱ्या दरातील या 4,158 घरांपैकी 404 घरे (उत्पन्न मर्यादा – 0 ते 3 लाख) ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि उर्वरित 3,754 घरे (उत्पन्न मर्यादा -3 लाखांपेक्षा अधिक) ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध करून देण्यात आली होती.
या महागृहनिर्माण योजनेस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळून सुमारे 16,000 अर्ज प्राप्त झाले. महागृहनिर्माण योजनेकरिता ऑनलाइन अर्ज करण्यास 3 ऑक्टोबर 2022 ही अंतिम तारीख होती. परंतु, अधिकाधिक नागरिकांना योजनेचा लाभ घेता यावा, याकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणीस 3 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला होता. यामुळे सुमारे 4 हजारांहून अधिक कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणे शक्य झाले.
सिडकोतर्फे गृहनिर्माण योजनेच्या संगणकीय सोडतीसाठी वापरण्यात येणारी प्रणाली (सॉफ्टवेअर) ही पूर्णत: मानवी हस्तक्षेपविरहित आहे. तसेच भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथील संगणक विभागाकडून या प्रणालीची तपासणी करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे काढण्यात येणाऱ्या सोडत प्रक्रियेमध्ये अर्जदारांमधील निवडक प्रतिनिधींना पंच म्हणून सहभागी करून घेतले जाते. तसेच सोडती दरम्यान पात्र अर्जदारांच्या आणि सदनिकांच्या यादीची यादृच्छिक (Random) पद्धतीने सरमिसळ करण्यात येते. अत्यंत पारदर्शक व निष्पक्ष अशा या प्रक्रियेद्वारे सर्व अर्जदारांना समान संधी सुनिश्चित करण्यात येते.
महागृहनिर्माण योजना ऑगस्ट – 2022 च्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या अर्जदारांची यादी सिडकोच्या lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अयशस्वी अर्जदारांची अनामत रक्कम 15 दिवसांच्या कालावधीमध्ये परत केली जाईल.
महागृहनिर्माण योजना ऑगस्ट – 2022 मध्ये यशस्वी ठरलेल्या अर्जदारांचे डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांनी अभिनंदन केले. तसेच अयशस्वी ठरलेल्या अर्जदारांनी निराश न होता सिडकोच्या महागृहनिर्माण योजना दिवाळी – 2022 करीता अर्ज करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महागृहनिर्माण योजना दिवाळी – 2022 अंतर्गत वेगाने विकसित होत असलेल्या उलवे नोडमधील बामणडोंगरी रेल्वे स्थानक, खारकोपर पूर्व 2ए, खारकोपर पूर्व 2बी आणि खारकोपर पूर्व पी3 येथे 7,849 सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
——————————————