गोवर बाधितांचे सर्वेक्षण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

एका बालकाचा मृत्यू

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई, 15 नोव्हेंबर 2022:

गोवर रोगाची लागण झालेल्या आणि रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या ठिकाणी सर्व आवश्यक औषधे उपलब्ध ठेवावीत. संसर्ग फैलवणार नाही याची काळजी घ्यावी. लसीकरणाचा वेगही वाढविणे आवश्यक असून बाधितांचे सर्व्हेक्षण मोठ्या प्रमाणावर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना दिले.

गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गोवर संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वूमीवर मुख्यमंत्र्यांनी मनपा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याशी दूरध्वनीवरून बोलून सूचना दिल्या. तसेच पालिकेचा आरोग्य विभाग कोणती खबरदारी घेत आहे ते जाणून घेतले.

मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांशीही चर्चा करून संसर्गावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाला सतर्क करून उपाययोजना करण्यास सांगितले. दरम्यान कस्तुरबा रुग्णालयात काल एका बालकाचा मृत्यू गोवरने झाला आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण 126 बालकांना गोवरचे निदान झाले आहे.

——————————————————————————————————-