राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथुर यांचे नागरिकांना आवाहन
नवी मुंबई, 4 जानेवारी 2017/AV News Bureau:
चोरीला गेलेला माल परत मिळाल्यानंतर नागरिक न्यायालयात हजर राहून साक्ष देण्यास टाळाटाळ करतात. मात्र हिच टाळाटाळ आरोपीच्या पथ्यावर पडते आणि न्यायालयात गुन्हा सिद्ध न झाल्यामुळे त्याला सोडून द्यावे लागते. त्याचा परिणाम तपास यंत्रणेवरदेखील होत असतो. त्यामुळे मुद्देमाल परत मिळाल्यानतरही नागरिकांनी पुढाकार घेऊन न्यायालयात साक्ष देण्यासाठी हजर रहावे असे आवाहन राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथुर यांनी वाशी इथे केलं.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्यावतीने मागील वर्षभरात चोरी झालेल्या आणि तपास पूर्ण झालेल्या मुद्देमालांचे वितरण माथुर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त दिलीप सावंत, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त नितीन चव्हाण, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त प्रशांत खैरे आदी उपस्थित होते. यावेळी १५४ नागरिकांना २ कोटी ३४ लाखांचा चोरीला गेलेला ऐवज परत करण्यात आला.
- पोलीस ठाणी उभारण्यास सिडकोला विनंती
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नवीन पोलीस ठाणी उभारण्याचे प्रस्ताव आहेत. याबाबत सिडकोच्या भूखंडांवर पोलीस ठाणी बांधून द्यावीत अशी विनंती सिडको प्रशासनाला करण्यात आली आहे. तसेच नव्या पोलीस ठाण्यांबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांनी सादर केल्यास त्यावर पुढील बैठकीत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत निर्णय घेवू, असेही माथुर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
- न्यायालयाच्या परवानगीने जप्त केलेल्या गाडयांची विल्हेवाट
जप्त केलेल्या गाड्या पोलीस ठाण्याच्या आवारात पडून असलेल्या वाहनांवर कार्यवाही करण्याबाबत बॉम्बे पोलीस मॅन्युअलमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित पोलीस ठाणी न्यायालयाची परवानगी घेवून अशा पडून असलेल्या वाहनांची विल्हेवाट लावू शकतात. तशा सूचना प्रत्येक पोलीस ठाण्याला देण्यात आल्या आहेत, असेही महासंचालक माथूर यांनी सांगितले.
- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 10 तारखेला बैठक
राज्यात अनेक महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येत्या 10 तारखेला बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये पुढील कामाची दिशा ठरविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मागील वर्षभरातील गुन्ह्यांची माहिती सादर केली तसेच नवी मुंबई शहरामधील गुन्ह्याचे प्रमाण कमी असल्याचेही यावेळी सांगितले.