एनएमएमटीस सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार

 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, ७ नोव्हेंबर २०२२

भारत सरकारच्या  गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारितील इन्स्टिट्युट ऑफ आरंबन ट्रान्सपोर्ट (इंडिया) यांचेमार्फत कोची येथे झालेल्या 15 व्या अर्बन मोबॅलिटी इंडिया परिषदेत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास ‘सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर (City with the Best Public Transport System)’ श्रेणीचा राष्ट्रीय प्रथम पुरस्कार देवून गौरविण्यात आले.महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या राष्ट्रीय मानाच्या पुरस्काराबद्दल एनएमएमटीच्या अधिकारी, कर्मचारीवृंदाचे कौतुक केले. तसेच या पुरस्कारामध्ये प्रवासी नागरिकांनी उपक्रमावर दाखविलेल्या विश्वासदर्शक सहकार्याचा मोठा वाटा असल्याचे मत व्यक्त केले आहे.   

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास राज्यमंत्री कौशल किशोर यांचे हस्ते नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने हा राष्ट्रीय गौरवाचा पुरस्कार परिवहन व्यवस्थापक  योगेश कडुसकर यांनी स्वीकारला. यावेळी मुख्य वाहतूक अधिकारी अनिल शिंदे, तुर्भे आगार व्यवस्थापक सुनिल जगताप, कार्यकारी अभियंता विवेक अचलकर उपस्थित होते.

राज्ये, मेट्रो, रेल्वे, वाहतूक उपक्रम इत्यादींकडून विहित नमुन्यात पुरस्कार प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर (City with the Best Public Transport System) या श्रेणीत नामांकन नोदविण्यात आले होते.

परिवहन उपक्रमाकडून करण्यात येत असलेल्या बस संचलनाबाबत एनएमएमटी परिवहनने दिलेली माहीती

  • पर्यावरणपूरक इंधनावर चालणाऱ्या बसेसचा जास्तीत जास्त वापर
  • शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी 100% पर्यावरणपूरक बसेसचे प्रवर्तन
  • मागील ६ महिन्याच्या कालावधीत ४ पटीने वाढलेली कॅशलेस तिकीट विक्री
  • प्रवाशी जनतेस सक्षम व सुलभ पद्धतीने प्रवाशी सेवा देण्यासाठी आय.टी.एम.एस. प्रणालीचा पुरेपूर वापर
  • परिपूर्ण प्रशिक्षित चालकांकडून ई बस चालवून ई बसेसचे परिचलन सुव्यवस्थितपणे करणे
  • प्रति कि.मी. मध्ये झालेली वाढ व त्या तुलनेने दैनंदिन बस संचलनातील प्रति कि.मी खर्चात झालेली घट.
  • बाह्यउत्पन्न वाढीसाठी करण्यात आलेले नियोजन व वाणिज्य प्रकल्पांचा विकास

 सदर पुरस्कार हा महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर यांचे मार्गदर्शन तसेच नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमात कार्यरत सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांचे अथक परिश्रम, परिवहन उपक्रमात कार्यरत कंत्राटदार व त्यांचे कर्मचारी आणि परिवहन उपक्रमाच्या कार्यक्षेत्रातील प्रवाशी जनतेच्या सहकार्याने प्राप्त झाला असल्याचे मत परिवहन उपक्रमामार्फत व्यक्त करण्यात आले आहे.