- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, ७ नोव्हेंबर २०२२
अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी वाशी भागात आलेल्या एक नायजेरियन नागरिकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. या नायजेरियन नागरिकाकडून १० लाख ३० हजार रुपये किंमतीचे मेथाक्युलॉन हस (एमडी) नावाचाअंमली पदार्थ ताब्यात घेतला आहे. गेल्या काही दिवसांमधील ही दुसरी मोठी घटना असल्यामुळे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांनी आपला मोर्चा नवी मुंबईकडे वळविल्याचे दिसून येते.
वाशी विभागातील जुहुगाव परिसरात ४ नोव्हेंबर रोजी नायजेरियन नागरिक अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी विभागाला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासीत अली सय्यद यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने वाशी जुहूगाव परिसरात सापळा रचला होता. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी कारवाई करून आरोपी किनीची न्वाॅनी ओबोंना (४२) या नायजेरियन नागरिकाला अटक केली. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे मेथाक्युलॉन हस (एमडी) नावाचा प्रतिबंधित अंमली पदार्थाचा साठा आढळून आला. १० लाख ३० हजार रुपयांच्या या अंमली पदार्थांसह एक मोबाइल फोन आणि स्कुटीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या नायजेरियन नागरिकावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासीतअली सय्यद करीत आहेत.
या कारवाईत अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे व.पो.नि. पराग सोनवणे, पोलीस कर्मचारी मांडोळे, चौधरी, पवार, गायकवाड, तायडे पवार,अहिरे, बांगर, जगदाळे तसेच प्रशासन कार्यालयातील राजपुत, गागरे आदींचा सहभाग होता.