आरोग्य केंद्रातील दोन कर्मचाऱ्यांना बजावली कारणे दाखवा नोटीस
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- ठाणे, ३ नोव्हेंबर २०२२
ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीबद्दल महापालिकाआयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले असताना सुद्धा हजेरीबाबत गैरशिस्त आणि वेळेत फिल्ड वर न जाणे यासाठी अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी आज दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी गुरूवारी सकाळी अचानक दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील आरोग्य केंद्रास भेट दिली. त्यांनी कर्मचारी उपस्थिती, फील्ड वर गेलेले कर्मचारी, डॉक्टरांची उपस्थिती आदींचा आढावा घेतला. त्यात त्यांना दोन कर्मचाऱ्यांची गैरशिस्त लक्षात आली. त्यामुळे, तातडीने त्यांना करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
ठाणे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स यांनी वेळेत कामावर हजर राहणे अपेक्षित आहे. त्यात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. जे कर्मचारी फील्ड वर जाणे अपेक्षित आहे, त्यांनी वेळेत तिथे हजर रहावे आणि पूर्णवेळ उपलब्ध रहावे, या बाबत सगळ्यांनी दक्ष राहावे, अशा स्पष्ट सूचना अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी या कारवाईच्या निमित्ताने पुन्हा दिल्या आहेत.