- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, २ नोव्हेंबर २०२२
नवी मुंबई महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यापासून राजेश नार्वेकर विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत प्रकल्पस्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करीत आहेत. केंद्र सरकारच्या अमृत योजने अंतर्गत कोपरखैरणे येथे उभारण्यात आलेल्या प्रतिदिन 20 द.ल.लि. क्षमतेच्या टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टच्या कार्यप्रणालीची आज आयुक्तांनी पाहणी केली.
सध्या या टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टमधून निर्माण होणारे 6 लक्ष लिटर पुनर्प्रक्रियाकृत पाणी तुर्भे एमआयडीसीतील 6 उद्योगसमुहांना प्रायोगिक स्वरुपात पुरविले जात असून उर्वरित पुनर्प्रक्रियाकृत पाणी अधिक उद्योगसमुहांना देण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधून तत्पर कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश यावेळी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अभियांत्रिकी विभागाला दिले.
केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत उभ्या राहिलेल्या या टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टचा 50 टक्के खर्च केंद्र व राज्य शासनामार्फत उपलब्ध होत असून कोपरखैरणे प्रमाणेच ऐरोली येथेही प्रतिदिन 20 द.ल.लि. टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट उभारण्यात आलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची शहरात 7 ठिकाणी सी-टेक या अत्याधुनिक तंत्रप्रणालीवर आधारित मलप्रक्रिया केंद्रे असून त्यामधील प्रक्रियाकृत पाणी उद्याने, दुभाजकांमधील वृक्षराजी, चौकांमधील कारंजी अशा विविध गोष्टींसाठी वापरले जात आहे.
या अत्याधुनिक मलप्रक्रिया केंद्रातील सेकंडरी ट्रिटमेंट होऊन बाहेर पडणा-या प्रक्रियाकृत सांडपाण्यावर अल्ट्रा फिल्टरेशन व अल्ट्रा व्हायलेट या प्रगत तंत्रज्ञानाव्दारे प्रक्रिया करून टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टमध्ये उद्योगसमुहांना उपयोगात आणता येईल अशा मानकाचे पुनर्प्रक्रियाकृत पाणी तयार केले जात आहे. अशा प्रकारचे प्रत्येकी 20 द.ल.लि. क्षमतेचे 2 टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट कोपरखैरणे व ऐरोली येथे उभारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे उद्योगसमुहांना हे पुनर्प्रक्रियाकृत सांडपाणी पुरविण्यासाठी एमआयडीसी भागात महापे येथे 1.5 द.ल.लि. क्षमतेचा, घनकचरा प्रक्रिया प्रकल्पस्थळानजीक तुर्भे येथे 2.5 द.ल.लि. क्षमतेचा आणि निब्बान टेकडी रबाळे येथे 0.75 द.ल.लि. क्षमतेचा अशा प्रकारे 3 ठिकाणी उच्चस्तरीय जलकुंभ उभारण्यात आले आहेत. या जलकुंभांतील पाणी पातळीची माहिती टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टमधील नियंत्रण कक्षात ऑनलाईन लाईव्ह दिसावी यादृष्टीने कार्यप्रणाली विकसित करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या. यावेळी शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, कार्यकारी अभियंता अजय संख्ये व विजय राऊत, कोपरखैरणे विभाग अधिकारी प्रशांत गावडे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या पाहणी दौ-यादरम्यान आयुक्तांनी अधिका-यांसमवेत प्लान्ट शेजारील निसर्गोद्यानाला तसेच तेथील मियावाकी उद्यानाला भेट देऊन परिसर पाहणी केली. मियावाकी उद्यानाची संकल्पना अत्यंत अभिनव असून शहरात आणखी काही ठिकाणी ही संकल्पना अंमलात आणून शहरातील हरित क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने पाहणी करून तशा प्रकारची स्थळे सूचवावीत असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
निसर्गोद्यानातील स्वच्छता पार्क ही अत्यंत अभिनव संकल्पना असून शालेय विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त अभ्यास सहली याठिकाणी आयोजित करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेमार्फत पुढाकार घेतला जावा व याठिकाणी येणा-या विद्यार्थ्यांच्या मनात सहजपणे स्वच्छतेचे महत्व रुजविण्याच्या दृष्टीने खेळ, माहितीपट, ऑडियो व्हिज्युअल माध्यम अशा विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.