नवी मुंबई महापालिका अधिकारी, कर्मचा-यांनी दिला एकतेचा संदेश
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, 31 ऑक्टोबर 2022:
लोहपुरूष सरदार पटेल यांची जयंती आज देशभरात एकता दिवस म्हणून साजरी करण्यात येत आहे. राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरील सर्व्हिस रोडवर महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी मानवी एकता साखळी करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रसारित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या पंचप्राण संकल्पनेत एकता ही एक महत्वाची संकल्पना आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनमोल योगदान देणारे स्वातंत्र्य सेनानी आणि स्वतंत्र भारताचे पहिले उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील एकता व अखंडतेसाठी अनमोल योगदान दिले आहे. त्यांच्या देशभक्तीचा यथोचित सन्मान करण्यासाठी शासन निर्देशानुसार एकतेचा उत्सव साजरा करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांनी एकतेचा संदेश प्रसारणासाठी अभिनव पध्दतीने तिरंगी मानवी एकता साखळीचे आयोजन करून राष्ट्राची एकता व अखंडता समर्थ राखण्यासाठी एकतेचे आवाहन केले. महानगरपालिकेच्या वास्तूसमोर सर्व्हिस रोडवर महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे आणि सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांनी या मानवी एकता साखळीत सहभागी होत हातात सलग तिरंगा पकडून राष्ट्रभक्तीचे दर्शन घडविले. एकाता दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी नागरिकांच्या सहभागाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
पावसाळी कालावधीत लावला न जाणारा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंदीत 225 फूट उंचीच्या ध्वजस्तंभावरील प्रतिकात्मक राष्ट्रध्वजही आज एकता दिनाचे औचित्य साधून आजपासून फडकविण्यात आला.
ज्वेल ऑफ नवी मुंबई ते महानगरपालिका मुख्यालय एकता दौड
श्री करियर ॲकॅडमी यांच्या सहयोगाने ज्वेल ऑफ नवी मुंबई ते महानगरपालिका मुख्यालय येथे एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले आणि परिमंडळ 1 चे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, परवाना विभागाचे उप आयुक्त डॉ. श्रीराम पवार यांच्या नियोजनानुसार आयोजित करण्यात आलेल्या या एकता दौडमध्ये 300 हून अधिक युवक, युवतींनी उत्साहाने सहभागी होत देशभक्तीपर घोषणा देत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रसारित केला.
मिनी सी शोअर वाशी येथे दौड
त्याचप्रमाणे मिनी सी शोअर वाशी येथे लेट्स सेलिब्रेट फिटनेस या संस्थेच्या सहयोगाने संस्थाप्रमुख रिचा समित यांच्यासह 125 हून अधिक नागरिक एकतेचा संदेश देणा-या दौडमध्ये सहभागी झाले. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे आणि वाशी विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त दत्तात्रय घनवट यांनी या दौडचे नियोजन केले.
——————————————————————————————————