- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, १९ ऑक्टोबर २०२२
काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीत ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा प्रचंड मतांनी विजय झाला असून त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होईल आणि धर्मांध हुकुमशाही शक्तींना पराभूत करेल, असा विश्वास काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे त्यांचे अभिनंदन करून बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, मल्लिकार्जुन खर्गे यांना ५० वर्षांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव असून या कारकीर्दीत खर्गे यांनी पक्ष संघटना व सरकारमधील विविध पदांवर काम पाहिले आहे. पक्षाने त्यांना दिलेल्या प्रत्येक जबाबदारीला त्यांनी योग्य न्याय दिला आहे. आपल्याला मिळालेल्या पदाचा त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी वापर केला. खर्गे साहेब महाराष्ट्राचे प्रभारी असताना त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. यावेळी त्यांच्यामधील नेतृत्वगुण आणि संघटनकौशल्य जाणून घेता आले. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला पुन्हा उभारी घेईल.
पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आमच्या सर्वांसाठी अखंड ऊर्जेचा प्रेरणा स्त्रोत आहेत. राहुल गांधी यांनी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी विभाजनकारी आणि विषमतावादी शक्तींविरोधात भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशव्यापी जन आंदोलन उभारले आहे, ही यात्रा इतिहास घडवणार आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खर्गेंच्या नेतृत्त्वाखाली देशात काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होईल, असेही थोरात म्हणाले.